शिवसेना ठाकरे व शिंदे गट संघर्ष: चिन्ह व पक्षाचे नाव अंधेरी पोट निवडणुकीसाठी गोठवले… निवडणूक आयोगाचा निर्णय
महाराष्ट्रातील राजकीय लढाईत दोन्ही गटाला मोठा झटका बसला आहे. शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्य बाण गोठवण्यात आलं आहे. शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण आयोगाकडून गोठवलं गेलं आहे.
शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटांना हे चिन्ह वापरता येणार नाही. दरम्यान हा निर्णय तात्पुरत्या स्वरुपाचा असल्याची माहिती आहे. केवळ अंधेरी पोटनिवडणुकीकरता हा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे.
१० ऑक्टोबरपर्यंत नव्या चिन्हासाठी दावा करण्याचे निर्देशही आयोगाकडून देण्यात आले आहेत. शिवसेना पक्षाचे नाव देखील या दोन्ही गटांना वापरता येणार नाही. नव्या चिन्हासाठी सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत आयोगाला पर्याय द्यायचे आहेत,
अशी माहिती मिळाली आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड करत शिवसेनेतून बाहेर पडत भाजपसोबत सरकार स्थापन केलं. तसेच संपूर्ण पक्ष माझ्यासोबत असल्याचं म्हणत शिवसेना पक्षावर आपला हक्का सादर केला होता.
त्यामुळे शिवसेना नाव आणि धनुष्यबाण या पक्ष चिन्हाचा मुद्दा निवडणूक आयोगाकडे गेला होता. मात्र आज निवडणूक आयोगाने हे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याचा निर्णय़ घेतला आहे. शिवाय शिवसेना नाव दोन्हीपैकी एकाही गटाला वापरता येणार नाही, हेही स्पष्ट करण्यात आलं आहे.
ठाकरे गटानं आज त्यांच्याकडील महत्त्वाची माहिती निवडणूक आयोगात सादर केली होती. शिवाय अंधेरी पोटनिवडणुकीत शिंदे गटाचा उमेदवारच नाही मग चिन्ह का मागतायत असा सवाल ठाकरे गटानं निवडणूक आयोगासमोर केला होता.
शिवाय शिंदेंनी अद्याप उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावर दावा केलेला नाही. त्यामुळे चिन्हाबाबतचा दावा पक्षप्रमुखांच्या परवानगीविना होऊ शकत नाही असं ठाकरे गटानं म्हटलं होतं.
आमच्याकडे राजधानी दिल्लीमध्ये दहा लाखांपेक्षा अधिक शपथ पत्र तयार आहेत. अडीच लाख पदाधिकाऱ्यांची शपथपत्रे आणि दहा लाखांपेक्षा अधिक प्राथमिक सदस्यांची शपथपत्रे तयार आहेत.
फक्त विहित नमुन्यामध्ये ती सादर करण्यासाठी आम्हाला चार आठवड्यांचा वेळ मिळावा. जर निवडणूक आयोगाला ती आत्ता आहे त्या स्थितीत हवी असतील तर ती पण आम्ही सादर करू, असा दावा उद्धव ठाकरे गटाचा निवडणूक आयोगासमोर केला होता.