शिवरीसह नऊ गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठी २७ कोटी १२ लाखांचा निधी… आमदार संजय जगताप यांची माहिती
सासवड ( प्रतिनिधी ) :-
पुरंदर तालुक्यातील शिवरी, खळद, वाळुंज, निळूंज, एखतपूर, मुंजवडी, तक्रारवाडी, साकुर्डे आणि बेलसर या आधिच्या शिवरी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील ९ गावांसाठी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत नवीन योजना करण्यात येत आहेत. सदर ९ गावं आणि वाड्या वस्त्यांवरील नागरीकांसाठी नव्याने करण्यात येत असलेल्या या योजनांसाठी २७ कोटी १२ लाख ९० हजार रुपयांच्या निधीला महाराष्ट्र शासनाने प्रशासकीय मंजुरी दिली असल्याची माहिती पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी दिली.
पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी याबाबत पाठपुरावा केला आहे.
सदर योजनेच्या अंदाजपत्रक व आराखड्यास जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत प्रशासकीय मंजुरी दिल्याचा शासन निर्णय १९ आॅगस्ट २०२२ रोजी प्रसिद्ध झाला आहे. यामध्ये दरडोई दरदिवशी ५५ लिटर पाणी देण्यात येणार असल्याची तरतूद असून योजना पूर्ण झाल्यावर १ वर्षे योजना चालविण्याची जबाबदारी ठेकेदारावर असल्याचे शासन निर्णयात नमुद केले आहे.
केंद्र आणि राज्य शासन जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत सर्व गावांतील प्रत्येक घरात नळाने स्वच्छ आणि शुद्ध पाणी पुरवठा करणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत राज्यातील ग्रामीण भागातील कुटुंबांसाठी नळाद्वारे गुणवत्तापूर्ण पेयजल पुरवठा करण्याचे निश्चित केले. गावठाण, वाड्या वस्त्यांसाठी स्वतंत्र पाझर विहिर, नवीन पंपगृह, स्वतंत्र साठवण टाक्या व पंपिंग मशिनरींचा समावेश आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद पुणे यांच्याकडून या नवीन योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. यातील आधिच्या योजना थकित पाणीपट्टी, वीजबील तसेच जलवाहिन्या कालबाह्य झाल्याने तसेच पाण्याच्या अपू-या उद्भवामुळे बंद झाल्याने नवीन योजना करण्यात येत आहेत.
पिलाणवाडी पाझर तलावातून ही योजना होणार असून या नवीन योजनेत शिवरी, खळद, वाळुंज, निळूंज, एखतपूर, मुंजवडी, तक्रारवाडी, साकुर्डे आणि बेलसर गावठाण, वाड्या वस्त्यांसाठी होत असलेल्या या योजनेत स्वतंत्र विहिर, नवीन पंपगृह, ७५ एच पी व्ही टी पंप, १५ एच पी चे सबमरसिबल पंप, जलशुद्धीकरण केंद्र, १ मुख्य संतुलन पाण्याची टाकी, पाण्याच्या ९ स्वतंत्र पाण्याच्या टाक्या, २७.७८ किमी लांबीची एचडीपीई व पीव्हीसी जलवाहिनी, सौर ऊर्जा प्रकल्प व पंपिंग मशिनरींचा समावेश आहे.