शिंदे गट दसरा मेळावा आम्ही गद्दार नाही, तुम्हीच गद्दार आहात… एकनाथ शिंदेचा ठाकरेंवर पलटवार
मुंबई, दि. ५ ( प्रतिनिधी) बीकेसी येथील दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घणाघाती टीका केली. विरोधकांच्या टीकेला एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं. खोके आणि गद्दार यावरुनही त्यांनी विरोधकांना सुनावलं. एकनाथ शिंदे यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी तुम्ही केली. आम्ही केलेली गद्दारी नाही तर गदर आहे, असे म्हणत विरोधकांच्या टीकेला एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
आम्ही गद्दार नाहीत तर बाळासाहेबांचे शिलेदार आहोत. आम्हाला बाप चोरणारी टोळी म्हणता, तुम्ही बापाचे विचार विकले, बापालाच विकण्याचा प्रयत्न केला असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. सत्तेसाठी तुम्ही हिंदुत्वाला तिलांजली दिली, मग खरे गद्दार कोण? असा सवालही त्यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला.
एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही गद्दार नव्हे तर तुम्हीच गद्दार आहात. तुम्ही वैचारिक व्याभिचार केला, विचारांशी पाप केलंय. त्यासाठी पहिला बाळासाहेबांच्या समाधीवर डोकं ठेवा, मग आमच्यावर टाकी करा. शिवसेना उभारण्यासाठी आम्ही 40 वर्ष काम केलं, आंदोलनं केली, लाठ्या-काठ्या खाल्ल्या. आता आम्हाला गद्दार म्हणता? बाळासाहेबांकडे बघून आम्ही गप्प बसलो. अडीच वर्षापूर्वीच अनेक आमदारांनी सांगितलं होतं की ही आघाडी योग्य नाही. पण आम्ही सहन केलं. पण बाळासाहेबांचे विचार खुंटीला टांगल्यानंतर आम्ही गप्प बसणं शक्य नव्हतं.
राज ठाकरे, नारायण राणे किती लोकं गेली, इथे निहार बसलाय… आम्ही सगळे चुकीचे आणि तुम्ही एकटे बरोबर. ही तुमची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही. शिवसेनेला कोणाच्याही दावणीला बांधू देणार नाही. स्वत: आत्मपरीक्षण कधी करणार. घरात बसून फक्त आदेश दिले. आम्हाला जो निर्णय घ्यावा लागला, तो आम्ही आनंदाने घेतला असे नाही. आम्हालाही वेदना झाल्या. गेल्या अडीच वर्षांची जी खदखद होती, तिचा उद्रेक होणारच. म्हणून तीन महिन्यांपूर्वी जूनमध्ये त्याचा उद्रेक झाला. त्याची दखल राज्याने नाही तर देशाने घेतली. हे परीवर्तन, हा उठाव, ही क्रांती होती, असेही शिंदे म्हणाले.
ते पुढे म्हणाले, या महाराष्ट्राला अन्यायातून मुक्त करण्यासाठी धाडसं लगतं.
येड्या गबाळ्याचे काम नाही. एकनाथ शिंदे जनतेसाठी काम करणारा कार्यकर्ता आहे. मला जीवाची पर्वा नाही.
वेडे लोकच इतिहास घडवतात. तुम्ही म्हणताय राजीनामा देऊन भाजपसोबत जा.
२०१९ मध्ये तुम्ही काँग्रेस – राष्ट्रवादीसोबत जाताना राजीनामा दिला होता का.
तुम्ही अडीच वर्षात फक्त अडीच तास मंत्रालयात गेलात.
तुमचा कारभार कोणालाही आवडत नव्हता. कोरोना- कोरोना म्हणून सगळं बंद केले.
तुमची दुकाने मात्र सुरु होती, असं धक्कादायक विधान एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.