शासन आपल्या दारी,चौथ्यांदा रद्द कार्यक्रमाला मुहूर्तच लाभेना….

जेजुरी, दि.२१ ( बी.एम. काळे) मोठा गाजावाजा करीत येत्या २३ जुलै रोजी होणारा शासनाचा शासन आपल्या दारी कार्यक्रम पुन्हा रद्द झाला आहे. कार्यक्रम तिसऱ्यांदा रद्द झाल्याने सर्वत्र याचीच चर्चा सुरू झाली आहे. तीन तिघाड सरकार असल्याने यांच्यात मेळ नसल्यानेच या कार्यक्रमाचे मुहूर्त रद्द होत असल्याची राजकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे.

महाराष्ट्र शासनाने मोठा गाजावाजा करीत पुणे जिल्ह्यातील जेजुरीत येथील पालखी मैदानावर संपूर्ण मैदानावर कोट्यवधी रुपये खर्चून कार्यक्रमाची जोरदार तयारी केली होती. सुरुवातीला ३ जुलै, नंतर १३ जुलै आणि उद्या २३ जुलै रोजी कार्यक्रम घेण्यात येणार होते. आता उद्याचा कार्यक्रम रद्द झाल्यानेचौथ्यांदा या कार्यक्रमाला मुहूर्त लाभला नाही.
कार्यक्रम रद्द का झाला याचे कारण मात्र समजू शकले नाही. मात्र या कार्यक्रमात लाभार्त्याना मिळणारे वेगवेगळे लाभ मात्र राजकारण्यांच्या खेळामुळे मिळत नसल्याने लाभार्थ्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
पुणे जिल्ह्यातील लाभार्त्यांसाठी शासनाने संपूर्ण जिल्ह्याचे प्रशासन गेले महिनाभर कामाला लावले होते. सर्वच विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांपासून अगदी शिपायापर्यंत शासकीय कर्मचारी आपली दैनंदिन कामकाज सोडून या कार्यक्रमाच्या तयारीला लागले होते. जेजुरीच्या शासन आपल्या दारी याच कार्यक्रमात जेजुरी देव संस्थान विकास आराखड्याच्या कामांचे भूमिपूजन करण्यात येणार होते. ते ही महिनाभरापासून रखडल्याने नाराजीचा सूर निघत आहे.

नाहीतर शासन आपल्या दारी या कार्यक्रमातून राज्याचे प्रमुख वीस ते २५ हजार लोकांसमोर आपले राजकीय वर्चस्व निर्माण करू पाहत आहेत. पण त्यालाही मुहूर्त मिळत नाही ही शोकांतिका आहे. राजकारण्यांच्या हट्टापायी शासकीय अधिकारी कामाला जुंपले असले तरी हा कार्यक्रम कितपत यशस्वी होईल याही शंकाच होत्या.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शासकीय पातळीवरून मोठे प्रयत्न होत होते. यासाठी संपूर्ण जिल्ह्यातील तालुका प्रशासन कामाला लागले होते. त्यासाठी प्रत्येक तालुक्यात गाव भेट दौरे काढले होते. पण ते दौरे लाभार्थ्याविना होत होते. पुरंदर तालुक्यातीलच माहिती घेतली तर हे दौरे लाभार्त्यांविनाच गाव भेट दौरे झाल्याचे निदर्शनास येत आहे.
शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून पुरंदर तालुक्यात १८ जुलै पासून गाव भेट दौऱ्याच्या आयोजन करण्यात आले होते यावेळी सक्षम अधिकाऱ्यांसह बहुतांश अधिकाऱ्यांनी या उपक्रमास दांडी मारली तर नागरिकांनीही माहिती अभावी याकडे पाठ फिरवल्याचे पाहवयास मिळाले.
पुरंदर तालुक्यामध्ये शासन आपल्या दारी हा उपक्रम होणार असून अनेक वेळा या कार्यक्रमाचे नियोजन होऊन ऐनवेळी रद्द झाला होता. पुन्हा २३ तारखेला हा कार्यक्रम होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर पुरंदर तालुक्यामध्ये गावोगावी गाव भेट दौऱ्याचे नियोजन केले होते. यासाठी तालुकास्तरीय सक्षम अधिकाऱ्यांच्या नियोजनाखाली गावातील सर्व खात्यांचे अधिकारी यांच्या उपस्थितीत गाव भेट दौरे आयोजित केले होते. मात्र या दौऱ्यामध्ये अनेक अधिकाऱ्यांना ऐनवेळी नियोजन समजले तर काहीनां आपण उपस्थित राहण्याचे समजले पण यावेळी काय करायचे हेच समजले नाही.
या दौ-यातील नियोजनानुसार वयोगटानुसार लाभार्थी- यामध्ये जन्माच्या वेळी मिळणारे लाभ, शिशु वयोगट, प्राथमिक शाळा, किशोरवयीन मुली, युवक, सर्वसामान्य नागरिक, महिला यांना मिळणारे लाभ याची माहिती देणे, सामाजिक लाभ – यामध्ये आरोग्य, दिव्यांग ,पेन्शन ,सनद वाटप इतर योजनांचे लाभार्थी यांना माहिती देणे, व्यावसायिक लाभ – यामध्ये दुग्ध उत्पादन, शेतकरी, बँकेकडील योजना यांची माहिती देत लाभार्थी निवड होणे अपेक्षित होते. यासाठी नायब तहसीलदार , मंडल कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच ,उपसरपंच,ग्रामसेवक,तलाठी,कोतवाल,कृषी सहाय्यक,बँक शाखा व्यवस्थापक,आरोग्य सेवक, पोस्टमास्तर,शिक्षक,अंगणवाडी कर्मचारी,आशा सेविका,पोलीस पाटील आदींनी उपस्थित राहणे अपेक्षित होते.
प्रत्यक्षात गावागावात सरपंच , ग्रामसेवक, कोतवाल, पोस्टमास्तर,अंगणवाडी कर्मचारी,आशा सेविका,पोलीस पाटील आदी उपस्थित होते. तर एकही लाभार्थी उपस्थित नव्हता. तर यामध्ये महत्त्वाचे भूमिका असणारे महसूल विभागाचे नायब तहसीलदार,तलाठी उपस्थित नव्हते.
याबाबत तलाठ्यांकडून माहिती घेतली असता त्यांनी निवडणूक कामी त्यांची नेमणूक असल्याचे सांगितले व आपण तेथे असल्याचे सांगितले ही परीस्थिती अनेक गावातील तलाठ्यांच्या बाबतीत असुन एकाच वेळी हा गाव भेट दौरा व निवडणूक कामी नेमणूक असल्याने कोठे जायचे ही संभ्रमावस्था होतीच.
ऐनवेळी गाव भेट दौऱ्याचे नियोजन झाल्याने अधिकारी व कर्मचारी हे नागरिकांपर्यंत पोहचू शकले नाहीत व नागरिकांना या उपक्रमावर बद्दल माहिती देऊ शकले नाही त्यामुळे नागरिकांची उदासीनता असल्याचे समजले. तर शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून नागरीकांना आपणास कोणते लाभ मिळणार आहेत हेच माहीत नाही व या उपक्रमाचा मोठा गाजावाजा जरी होत असला तरी प्रत्यक्षात मात्र यामध्ये कोणत्याही प्रकारे नवीन लाभार्थ्यांची निवड होताना दिसत नसून पूर्वी दिलेला लाभार्थ्यांना एकत्रित करून त्यांचेच लाभाचे आकडे सांगितले जात असल्याची चर्चा गावोगावी ऐकायला मिळत होती.
पुरंदर चे तहसीलदार विक्रम राजपूत यांनी तालुक्यातील मंडळाधिकारी, तलाठी, कोतवाल यांना दि.१२ जुलै रोजी निवडणूककमी आदेश काढलेले आहेत. आणि त्यानंतर दि.१७ जुलै रोजी शासन आपल्या दारी गावभेट दौरा हा दुसरा आदेश काढला असल्याने अनेक महसूल कर्मचारी या दौऱ्यात उपस्थितच राहिले नव्हते. यामुळे गावागावात महसूल लाभार्थ्याना कोणतीच माहिती मिळू शकले नसल्याचे ही गावागावातून सांगण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page