शहरातील साथीचे आजार आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करा, अन्यथा आंदोलनास सामोरे जा- संभाजी ब्रिगेड चा इशारा

जेजुरी,दि.५ तीर्थक्षेत्र जेजुरी शहर व पंचक्रोशीमध्ये डेंग्यू ,चिकूनगुणिया ,मलेरिया, हिवताप ,गोचीडताप अशा सदृश्य साथींच्या आजाराने थैमान घातले असून परिसरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षणीय आहे.जेजुरी नगरपालिका प्रशासन व जेजुरी ग्रामीण रुग्णालय यांनी संयुक्तिकरित्या प्रभावी उपाययोजना राबवावी अन्यथा तीव्र आंदोलनाला सामोरे जावे असा सज्जड इशारा संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
सोमवारी(दि.५) संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजयसिंह (लोकेश) सावंत ,शहराध्यक्ष तथा देवसंस्थान विश्वस्त संदीप जगताप,रमेश शेरे ,विलास कड ,विक्रम शिंदे ,शिवाजी जगताप,सलीम तांबोळी ,सागर खोमणे ,अजय पठाण, मनसेचे तालुकाध्यक्ष उमेश जगताप ,आदी पदाधिकारी -कार्यकर्त्यांनी जेजुरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले , ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक वैदयकीय अधिकारी डॉ. मनोहर सोनवणे यांची भेट घेऊन चर्चा करीत निवेदन दिले.
जेजुरी शहराच्या प्रत्येक प्रभाग व वार्डात साथींच्या रोगांचे थैमान घातलेले आहेत. सर्वसामान्य नागरिकांना या आजारांचा सामना करीत उपचार घेताना आवाक्याबाहेरचा खर्च होत आहे ,सध्या सणासुदीचे दिवस आहेत. जंतूनाशक धुरळणी -फवारणी यंत्रणा प्रभावित करणे ,आरोग्य विभागाच्या कर्मचारी -अधिकारी यांनी घरोघरी भेट देऊन तपासणी मोहीम राबवणे , गप्पी मासे पुरवठा करणे ,शहरामध्ये गटारे -नाले यांची वेळेच्यावेळी साफसफाई करणे,साथींचे रोग टाळण्यासाठी जनजागृती करणे,ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची तपासणी मोहीम द्रुतगतीने राबवणे ,औषधांचा पुरेसा साठा ठेवणे , आदी उपाययोजना होणे महत्त्वाचे आहे .अशी मागणी या चर्चेत करण्यात आली .
मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले यांनी सांगितले कीं,सध्या प्रत्येक वार्डमध्ये दर तीन दिवसांनी तपासणी मोहीम सुरू असून आरोग्य विभाग प्रशासनाचे २व नगरपालिका प्रशासनाचे ८कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
पुढील काळात विविध सामाजिक संस्थाची मदत घेऊन गतिमान कार्यप्रणाली राबविण्यात येणार आहे.

ग्रामीण रुग्णालयात पुरेशा कर्मचाऱ्यांचा अभाव.
ग्रामीण रुग्णालयात सध्या प्रभारी १वैदयकीय अधीक्षक , २ वैदयकीय अधिकारी ७ परिचारिका ,४ शिपाई ,२ सुरक्षारक्षक ,२ प्रयोगशाळा तंत्रज्ञ,
व १औषध निर्माण अधिकारी असून पुरेशा कर्मचाऱ्यांचा अभाव आहे . रुग्णालयात किमान १५०हुन अधिक बाह्यरुग्ण तपासणीसाठी येतात, त्यामुळे कायमस्वरूपी वैदयकीय अधीक्षक यांच्यासह येथे काही पदे भरणे अत्यन्त गरजेचे असल्याचे तसेच कर्मचारी अधिकारी यांना निवासस्थाने निर्माण करणे गरजेचे असल्याचे.डॉ.मनोहर सोनवणे यांनी सांगितले .
सध्याच्या स्थितीचा सामना करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाबरोबर संयुक्तिक बैठक घेऊन साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

देवसंस्थानकडून करणार सर्वतोपरी मदत
जेजुरी हे तिर्थक्षेत्राचे व धार्मिक विधींचे शहर आहे .देवदर्शन कुलधर्म कुलाचार यासाठी राज्यातून अनेक भविकभक्त जेजुरीत दाखल होतात ,बहुतांश येथे निवासी असतात त्यांच्या व नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने साथींचे आजार आटोक्यात आणण्यासाठी नगरपालिका प्रशासन व जेजुरी ग्रामीण रुग्णालयाने प्रभावी उपाययोजना राबवावी ,शहरातील स्वच्छता ,जंतूनाशक फवारणी -धुरळणी याकामी मार्तंड देवसंस्थान समिती सर्वतोपरी मदत करणार असल्याचे आश्वासन विश्वस्त संदीप जगताप ,शिवराज झगडे ,पंकज निकुडेपाटील यांनी यावेळी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page