वेश्यावसाय करणाऱ्या हॉटेलवर जेजुरी पोलिसांची बनावट ग्राहक पाठवून छापा….दोन मुलींची सुटका
जेजुरी, दि.२३ जेजुरी सासवड रोड वरील मौजे बेलसर गावचे हद्दीतील वेश्यावसाय सुरू असणाऱ्या लक्ष्मी नारायण लॉज वर जेजुरी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवीत छापा टाकून कारवाई केली. यात वेश्याव्यवसायासाठी पश्चिम बंगाल मधून आणलेल्या दोन मुलींची सुटका करण्यात आली.
याबाबत जेजुरी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जेजुरी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात जेजुरी सासवड मार्गालगत असणाऱ्या लक्ष्मी नारायण लॉज वर वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती जेजुरी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार जेजुरी पोलिसांनी आज सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास लॉज वर एक बनावट ग्राहक पाठवले. बनावट ग्राहकाने खात्री करून पोलिसांना इशारा केला असता पोलिसांनी छापा टाकला. यात वेश्याव्यवसायासाठी आणलेल्या पश्चिम बंगाल मधून आणलेल्या दोन मुली आढळून आल्या.
जेजुरी पोलिसांनी लॉज व्यवस्थापक रामा नारायण मोगाविरा ( वय ३८ वर्षे ) रा. हॉटेल जय भवानी, सासवड रोड, वडकी, ता हवेली यास ताब्यात घेतले. वेश्याव्यवसायासाठी आणलेल्या मुलींची सुटका करण्यात आली आहे.
जेजुरी पोलिसांनी आरोपी लॉज व्यवस्थापकास अटक करून त्याच्यावर स्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा १९५६ चे कलम ३,४,(१),५,७ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे
सदर कारवाई जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार सोनवलकर, पोलीस हवालदार नंदकुमार पिंगळे, पोलीस हवालदार एन.आर.दोरके, पोलीस नाईक गणेश नांदे यांनी पार पाडली.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार सोनवलकर करीत आहेत.