विद्यार्थ्यांनी अभ्यासात रमावे, तुमचे भविष्य उज्वल असेल – पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे पाटील….

जेजुरी, दि. १७ शालेय विद्यार्थ्यांनी अभ्यासात रमले पाहिजे, उत्कृष्ठ गुणवत्ता मिळवली तर तुमचे भविष्य ही तेवढेच उज्वल असेल असे प्रतिपादन जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे पाटील यांनी केले आहे
नाझरे कडेपठार ( ता. पुरंदर ) येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री. नागेश्वर विद्यालयात ते वैयक्तिक आणि सामाजिक सुरक्षा मार्गदर्शन कार्यक्रमात बोलत होते. ते पुढे म्हणाले, आजचे युग अत्यंत वेगवान आहे, इंटरनेट मुळे संपूर्ण जग जवळ आलेले आहे. प्रत्येकजण अपडेट बनला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरातील माणसे आपल्याला जोडली जात आहेत. मात्र सोशल मिडीया जसे आपल्यासाठी जसे म्हत्वाचे आहे तेवढेच ते आपल्यासाठी घातक ही सिद्ध झालेले आहे. अशा प्रसार माध्यमांचा उपयोग केवळ कामपूरताच करावा. यातून आपली मोठी फसवणूक होत असते. आपली संपूर्ण माहिती एका क्लिकवर इतरांपर्यंत पोहोचू शकते. वापर करावा पण कशासाठी केला पाहिजे हे तेवढेच महत्वाचे आहे. शालेय शिक्षण घेताना आपल्या ध्येयाशी एकनिष्ठ राहा यश आपोआप आपल्या पायाशी लोळण घेईल. याशिवाय शाळा, परिसर अथवा इतरत्र सामाजिक क्षेत्र किंवा सार्वजनिक ठिकाणी वावरताना नेहमी सतर्क असायला हवे. अनोळखी व्यक्तीच्या संपर्कात जाण्यापूर्वी त्याची संपूर्ण माहिती आपल्याला असायला हवी. जशी स्वतःची सुरक्षा महत्वाची आहे तशीच सामाजिक सुरक्षा ही महत्त्वाची असून जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली हद्दीतील गावांतून याबाबत मार्गदर्शन केले जात असल्याचेही श्री साबळे पाटील यांनी सांगितले.
यावेळी पुरंदर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष संदीप चिकणे, जेजुरी पोलीस ठाण्याचे नाझरे बीट अंमलदार संदीप भापकर, आदींची यावेळी भाषणे झाली.
यावेळी विद्यार्थ्यांनी सामाजिक व वैयक्तिक सुरक्षेबाबत मान्यवरांशी थेट संपर्क साधत आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.
कार्यक्रमाला माजी सरपंच बारकू नाझीरकर, विनायक कापरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतीश खैरे, सदस्य जालिंदर वायसे, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन सदाशिव चिकणे, शरद विकास सोसायटीचे चेअरमन नितीन नाझीरकर, स्कुल कमिटीचे सदस्य पांडुरंग कापरे, माऊली नाझीरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक व सूत्रसंचालन डी. एस निकुंभ यांनी तर आभार के. डी. भावसार यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page