विद्यार्थ्यांना वयानुरुप वर्गामध्ये प्रवेश द्यावा. शालेय शिक्षण विभागाचा आदेश जारी…
“शिक्षण हक्क कायद्यानुसार,शाळेत दाखल झालेल्या विद्यार्थ्याना त्यांच्या वयानुसार संबंधित वर्गात प्रवेश दिला जाईल.तसेच प्रवेशासाठी वयाचा पुरावा ग्राह्य धरण्याची तरतूद करण्यात आली आहे.”
- दीपक केसरकर
शालेय शिक्षण मंत्री
मुंबई ,दि. १२ ( प्रतिनिधी ) -इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना जन्मतारखेच्या दाखल्यावरुन वयानुरूप वर्गामध्ये प्रवेश देण्यात येईल.अशा प्रवेशासाठी वयाचा पुरावा ग्राह्य समजण्यात यावा.त्यानुसार संबंधित विद्यार्थ्याचा जन्मतारखेचा दाखला पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येऊन विद्यार्थ्यांना वयानुरुप वर्गामध्ये प्रवेश देण्यात यावा.असा शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाने जारी केला आहे.
राज्यातील कोणत्याही अभ्यासक्रमाच्या प्राथमिक अथवा माध्यमिक शाळेत इयत्ता पहिली ते दहावीच्या वर्गात प्रवेशासाठी इतर शाळेतून आलेला विद्यार्थी मागणी करत असेल तर त्या विद्यार्थ्याला आता अतिशय सोप्या पद्धतीने संबंधित शाळेत प्रवेश घेता येणार आहे. अशा प्रवेशासाठी जन्मतारखेचा दाखला वयाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात यावा. व संबंधित विद्यार्थ्यांना वयानुरुप वर्गामध्ये प्रवेश देण्यात यावा. प्रवेशासाठी मागणी करीत असलेल्या विद्यार्थ्यास शाळा स्थलांतर प्रमाणपत्र (टी.सी.)अभावी प्रवेश नाकारण्यात येऊ नये.
कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही. तसेच शिक्षण खंडित होऊन विद्यार्थी शाळाबाह्य होऊ नये.याची दक्षता संबंधित शाळांनी घ्यावी असे विद्यार्थी वंचित ठेवल्यास संबंधित शाळांविरुद्ध कायद्यातील तरतुदी व नियमानुसार कारवाई करण्यात येईल.
याशिवाय विद्यार्थ्याने नवीन शाळेत प्रवेश घेतल्यानंतर, त्याची ‘सरल’ पोर्टलवरील माहिती मिळविण्याची विनंती जुन्या शाळेकडे केल्यावर त्या शाळेने सात दिवसात विनंती मान्य करावी.अन्यथा संबंधित केंद्रप्रमुख ती विनंती त्यांच्या स्तरावरुन मान्य करतील,असेहघ शासन निर्णयात सांगण्यात आले आहे.