विद्यार्थ्यांची सरलमध्ये आधार नोंदणी अपूर्ण
५५०८ मुख्याध्यापकांवर कारवाईची टांगती तलवार !!
जेजुरी, दि.३ – ( प्रतिनिधी )
१ नव्हे…२ नव्हे…१०० नव्हे….१००० नव्हे …. तर पुणे जिल्ह्यातील तब्बल ५५०८ शाळांनी शासनाच्या सरल प्रणालीमध्ये संबंधित शाळांमध्ये शिकणाऱ्या १०० % विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणीचे काम पूर्ण न केल्याप्रकरणी ५५०८ मुख्याध्यांपकावर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित का करु नये ? याबाबत ‘कारणे दाखवा नोटीसा’ देण्यात आल्या आहेत.
एकाच वेळी पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड व माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे यांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये ५५०८ मुख्याध्यापकांना व्हाट्सअप द्वारे नोटीसा (फक्त एकच पत्र) बजावण्यासाठी अनाधिस्त यंत्रणेला कळवले आहे.या पत्रासोबत १३५ पानांची शाळा व मुख्याध्यापकांना नोटीसा देण्यासाठी व्हाट्सअपद्वारे (पीडीएफ फाईल) यादी पाठवली आहे.त्यामुळे पुणे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील सर्वच तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी व केंद्रातील केंद्रप्रमुख यंत्रणा ५५०८ शाळांतील मुख्याध्यापकांना नोटिसा देण्यासाठी कामाला लागली आहे. एकाच वेळी ५५०८ नोटीसा दिल्याने शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
देश व राज्य पातळीवरील शासनाच्या विविध लाभाच्या योजनांचे नियोजन करताना सदर माहिती आधारभूत मानली जाते.तसेच शाळेत दाखल इयत्ता १ ली ते १२ वी इयत्तेत शिक्षण घेत असलेली विद्यार्थी संख्या निश्चित होत असते.
याबाबत जिल्हास्तर व तालुकास्तरावर कार्यशाळा घेऊन सरल आधार नोंदणी बाबतचे गांभीर्य निदर्शनास आणून दिले होते.तरी देखील विद्यार्थ्यांचे आधार नोंदणीचे काम पूर्ण न केल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.
मुख्याध्यापकांनी महत्त्वाच्या कामाकडे दुर्लक्ष करून प्रशासकीय कामात आणि कर्तव्यात कसूर केली आहे. त्यामुळे याची जबाबदारी निश्चित करुन ५५०८ मुख्याध्यापकांविरुद्ध महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवाशर्ती) नियम १९८१ नुसार कारवाई का प्रस्तावित करण्यात येऊ नये ? याचा खुलासा नोटीस मिळाल्यापासून चार दिवसात प्रलंबित आधार नोंदणी काम पूर्ण करुन करावा.खुलासा असमाधानकारक व मुदतीत प्राप्त न झाल्यास मुख्याध्यापकाविरुद्ध योग्य ती शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.
अशा प्रकारे एकाच वेळी ५५०८ मुख्याध्यापकांना पुणे जिल्हा परिषदेने नोटीसा बजावल्यामुळे संबंधित मुख्याध्यापकांवर काय कारवाई होणार ? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागूले आहे.