विचित्र, पण धक्कादायक …
तरुणाने स्वतःचेच घर आणि गाडी पेटवली.
शिरूर, दि. २७ ( प्रतिनिधी ) रागाच्या भरात तरुण मुलं काय करतील याचा नेम नाही. अशीच एक घटना पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील पिंपळ जगताप येथे घडली आहे.
तरुणाने रागाच्या भरात स्वत:च्या घराला आणि गाडीला आग लावली. हा प्रकार गावात जत्रा सुरु असताना घडला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी हजर झाले होते. पोलिसांनी आणि नागरिकांनी आग विझवली. याप्रकरणी पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले आहे.
अटक केलेल्या तरुणाचे प्रज्योत तांबे असे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळे जगताप येथील बोत्रेवस्ती येथील प्रज्योत तांबे याचे आई-वडील वाजेवाडी येथे गेले होते. त्याचवेळी त्याने घराच्या बाजूला पार्क केलेल्या गाडीला आग लागवी. त्यानंतर तो घरात शिरला आणि घरातील वस्तूंना आग लावली. गाडीने पेट घेतल्याने चारही टायर आणि गाडीच्या एसीच्या सिलेंडरचा स्फोट झाला. त्यानंतर प्रज्योतने तिथून पळ काढला. यात गाडी जळून खाक झाली.
घराला लागलेली आग पाहून शेजारी घाबरले. त्यांनी पाण्याची मोटार चालू करुन आग विझवली.
शेजारी आग विझवेपर्यंत कार जळून खाक झाली होती. शिवाय घरातील सर्व धान्य, कपडे यांसह काही
महागड्या वस्तू जळून खाक झाल्या होत्या. यावेळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. त्यापैकी एकाने पोलिसांना घटनेची माहिती दिली.
प्रज्योतने गाडी आणि घराला आग लावली आणि गावात सुरु असलेल्या यात्रेतील तमाशात जाऊन बसला.
प्रज्योत तमाशात असल्याची माहिती पोलिसांना समजल्यावर पोलिसांनी थेट तमाशात जाऊन त्याचा शोध घेतला.
त्यावेळी तो तमाशात रमलेला होता. त्याचवेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.