वाल्हे प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांचा अभाव,रुग्णांचे होतात हाल. पदे भरण्याची सरपंच अमोल खवले यांची मागणी.
वाल्हे दि.२९, ( प्रतिनिधी ) कोरोनामध्ये ग्रामीण जनतेला सर्वाधिक उत्तम दर्जाची आरोग्य सेवा प्राथमिक, ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सेवक, सेविका आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनीच दिली आहे. कोरोनाच्या भीतीमुळे अनेक खासगी मोठ्या रुग्णालयांनी आरोग्य सेवा थांबविली होती. अनेक रुग्णांना वेळेत उपचार झाले नसल्यामुळे त्यांचा बळी गेला आहे. कोरोनामध्ये शासकीय आरोग्य यंत्रणा कशी सक्षम असली पाहिजे, हे सिद्ध झाले आहे. तरीही केंद्र आणि राज्य सरकार शासकीय आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे तातडीने भरत नाही. मूलभूत सुविधांचा तेथे अभाव असल्यामुळे वैद्यकीय अधिकारी रुग्णांना उत्तम दर्जाची सेवा देऊ शकत नाहीत.
कोरोना काळातही अपुऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसमवेतच आरोग्य यंत्रणा काम करत होती. आरोग्य केंद्र, उपकेंद्रासोबतच ग्रामीण रुग्णालयातील पदे रिक्त आहेत. कोरोना काळात आरोग्य यंत्रणेने चांगले कार्य केले. बाहेर गावाहून आलेल्या नागरिकांना क्वारंटाईन करणे तसेच सर्वेक्षण मोहीम राबवण्याचे महत्त्वाचे काम आरोग्य केंद्र व आरोग्य उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांनी केले. रिक्त जागांमुळे सर्वेक्षण मोहीम व कोरोनासंबंधी इतर कामे करताना अतिरिक्त ताण सोसावा लागलात आहे.
वाल्हे (ता.पुरंदर) येथे प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे हे आरोग्य केंद्र सलाईनवर असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
दरम्यान, पुणे- पंढरपूर पालखी
वाल्हे येथे हे आरोग्य केंद्र आहे. या अरूंद पालखी महामार्गावर अनेक छोटो- मोठे अपघात घडत असतात. अशावेळी अपुऱ्या कर्मचारीवर्गामुळे आरोग्य सेवा देताना अनेक अडचणीं येत असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, त्यामुळे या केंद्रांतर्गत येणाऱ्या ४७९७ कुटुंबातील २२२२५ (लहान मुले सोडून) नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारे हे आरोग्य केंद्र अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे आरोग्य सेवा देण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे.
लोकसंख्येच्या तुलनेत या आरोग्य केंद्रांवर प्रचंड ताण येतो. आरोग्यसेविकांच्या मंजूर १४ पदांपैकी तब्बल ८ पदे रिक्त असल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. सर्व प्रकारचे लसीकरण, पोलिओ डोस, कोरोना लसीकरण, विविध आजारांची नोंद व औषधोपचार, रोग प्रतिबंधक कामे, आरोग्यविषयक जनजागृती, आरोग्य शिक्षण, गर्भवती स्त्रिया व विद्यार्थ्यांची तपासणी, सरकारच्या विविध योजना तळागाळात पोहचवणे आदी कामे पदे रिक्त असल्यामुळे रखडत आहेत.
वाल्हे प्राथमिक आरोग्य विभागाला रिक्त जागांचे ग्रहण लागले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपेंद्रातील बहुतांश पदे रिक्त असल्यामुळे उपलब्ध असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत आहे. कोरोना कालावधीत आरोग्यदूत बनलेल्या आरोग्य केंद्राचे काम वाखाणण्याजोगे होते. कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळे आहे त्या कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
त्यातच आवश्यक सोयीसुविधांची वाणवा असल्यामुळे आरोग्य विभाग सलाईनवर असल्याची परिस्थिती दिसून येत आहे.
“आरोग्यसेविका उपलब्ध नसल्याने बऱ्याचदा आरोग्य उपकेंद्र बंद ठेवावे लागत असून, लांबून येणाऱ्या रुग्णांना आरोग्य सेवेचा लाभ न घेता परत जावे लागते. शिवाय, वेळ व पैसाही वाया जातो. लसीकरण व इतर कामेही वेळेवर होत नाहीत. त्यामुळे सर्व रिक्त पदे लवकर भरण्यात यावीत. तसेच या आरोग्य केंद्राअंतर्गत येणा-या नागरिकांनी येथील आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे. येथे कर्मचारीवर्ग कमी असल्याने, आरोग्य सेवा देताना तारेवरील कसरत करावी लागत आहे.” असे आवाहन वाल्हे चे सरपंच अमोल खवले यांनी केले आहे.
“रिक्त पदे भरण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा परिपषदेकडे नियमित रिक्त पदांच्या आकडेवारीचा अहवाल सादर केला जातो. येथील रिक्त पदे भरल्यास आरोग्य सेवेचे कामकाज अधिक गतीने होईल. सध्या तरी नागरिकांना वेळवर व चांगली आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न करत आहोत”. अशी माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैदयकीय अधिकारी डॉ. प्रशांत आंधळे दिली आहे.
वाल्हे प्राथमिक आरोग्य केंद्रातील मंजूर व रिक्त पदे पुढील प्रमाणे
वैद्यकीय अधिकारी – मंजूर पदे २, रिक्त १.
औषध निर्माण अधिकारी, जे एन.एम.पद, कनिष्ठ सहाय्यक पद मंजूर असूनही भरलेले नाही.
आरोग्य सेविका- मंजूर पदे ५, भरलेली ४, रिक्त १.
परिचर – मंजूर पदे ४ असूनन फक्त एकच भरलेले आहे तीन रिक्त आहेत.