वार करायचा तर समोरून करा-आदित्य ठाकरे ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल…
मुंबई, दि.१० आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे.
राक्षसी महत्त्वाकांक्षेपोटी शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न होत आहे. वार करायचे असतील तर समोरुन या,” असं आव्हान आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाला दिला. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आदित्य ठाकरे यांनी पहिली मुलाखत एबीपी माझाला दिली. यावेळी त्यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. वरळी (Worli) मतदारसंघातील कोळीवाड्याच्या दौऱ्याच्या वेळी त्यांनी एबीपी माझाशी संवाद साधला.
निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आदित्य ठाकरे म्हणाले की, “काल उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. हे अपेक्षित नव्हतं, मात्र झालं. आता लढायचं आणि जिंकायचं, पुढे जायचं आहे.” “आपल्या राज्यात जे चाललंय ते घटनाबाह्य आहे. गद्दारांचे सरकार हे घटनाबाह्य आहे. संविधानाला सुद्धा यामुळे मोठा धोका निर्माण होऊ शकतो,” असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
शिवसेना संपवून टाकण्याचे अडीच वर्षांपासून प्रयत्न
खोके सरकारमधला जो काही गद्दारांचा गट आहे तो एकदम निर्लज्जपणे राजकारण खालच्या पातळीवर नेत आहे. इतकं घाणेरडे राजकारण महाराष्ट्राच्या राजकारणात कधीच पाहिलं नव्हतं. त्यांना आसुरी आनंद जो शिवसेना संपवण्याचा प्रयत्न करताना मिळतोय, तो त्यांना कधीच मिळणार नाही. महाराष्ट्रातील जनता, देशाची जनता शिवसेनेसोबत आहे. खोके सरकारने स्वतःला विकलं आहे. दोन-तीन नेत्यांच्या स्टेटमेंटवरुन असं दिसतंय की शिवसेना संपवून टाकायची आहे. अडीच वर्षापासून अशाप्रकारचे प्रयत्न सुरु होते.
हिंमत असेल तर 40 जणांनी राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे जा : आदित्य ठाकरेंचं आव्हान
उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांनी या 40 आमदारांना सर्व काही दिलं. त्यांच्या त्याच राक्षसी महत्त्वाकांक्षेमुळे ते पक्ष संपवायला निघाले आहेत. वार करायचे असतील तर समोरुन या. यांना स्वतःची ओळख नाही. माझ्या आजोबांचं नाव घेऊन पक्षाचं नाव घेऊन चिन्ह घेऊन राजकारण करत असाल तर कोणाला पटणार नाही. हिंमत असेल तर 40 जणांनी राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे जा. ती हिंमत त्यांची होत नाही. वार पाठीत करु नका, समोरुन करा, अशा तिखट शब्दात आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटातील आमदारांवर केला.