वह्यांची पाने पुस्तकातच जोडणार- शिक्षण मंत्री केसकरांची माहिती दप्तराचे ओझे कमी होणार ?
मुंबई, दि.३० विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी राज्याचा शालेय शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे. यासाठी पाठ्यपुस्तकाची तीन भागात विभागणी केली जाणार आहे.
विशेष म्हणजे पुस्तकांतच लिखाणासाठी वहीची पाने जोडण्याचाही प्रस्ताव आहे. त्यावर विचारविनिमय सुरू असल्याची माहिती राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना दिली.
विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे कमी करण्यासाठी शालेय शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे. त्यासाठी पाठ्यपुस्तकाची तीन भागांत विभागणी करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र पुस्तकांची विभागणी केल्यानंतरही वह्यांच्या ओझ्याचा प्रश्न कायम राहतो. त्यामुळे याबाबत नवीन प्रस्तावावर विचार सुरू आहे. यात विभागणी केलेल्या पाठ्यपुस्तकालाच लिखाणासाठी वहीची पाने जोडण्याचा विचार सुरू आहे. पाठ्यपुस्तकालाच वहीची पाने जोडल्यास लिखाणासाठी, नोटस् काढण्यासाठी स्वतंत्रपणे वही बाळगण्याची आवश्यकता राहणार नाही, असे केसरकर यांनी सांगितले. मात्र, याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. शालेय शिक्षण विभाग या प्रस्तावासंदर्भात विचार करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पाठ्यपुस्तकातच लिखाणासाठी वहीचा पर्याय उपलब्ध झाल्यास राज्यभरातील विद्यार्थी आणि पालकांची मोठी सोय होणार असल्याचे मंत्री केसरकर यांनी स्पष्ट केले. पुस्तकालाच वहीची पाने जोडल्यास नोटस् काढण्यासाठी स्वतंत्र वही बाळगण्याची आवश्यकता भासणार नाही. शिवाय, एकाच विषयाचे किंवा संदर्भातील वेगवेगळी टिपणे काढण्यापासून विद्यार्थ्यांची सुटका होईल, असा विश्वास केसरकर यांनी व्यक्त केला.
ओझे कमी होणार की…!
मुलांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून विविध पर्यायांची चाचपणी सुरू आहे. मात्र, अद्याप योग्य तोडगा विभागाला काढता आला नाही. चारच महिन्यांपूर्वी महाविकास आघाडी सरकारच्या काळात एकात्मिक पुस्तक संकल्पनेवर विचार सुरू होता. एकात्मिक पुस्तक संकल्पनेत वेगवेगळ्या विषयांचे धडे एकत्र करून एक पुस्तक तयार करण्यात येणार असल्याची माहिती तत्कालीन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती. आता पाठ्यपुस्तकालाच वहीची पाने जोडण्याची संकल्पना विद्यमान शिक्षणमंत्री केसरकर यांनी मांडली आहे. त्यामुळे ही संकल्पना प्रत्यक्षात उतरते की केवळ कागदावरच राहते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.