लंपी रोगाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षी भाद्रपद बैल पोळा रद्द, पशुसंवर्धन विभागाचे आदेश..
जेजुरी, दि. २१ कोरोना नंतर आता लंपी रोगाने जनावरांवर मोठे संकट निर्माण झाले आहे. यामुळे शासकीय पातळीवरून आजार आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. रोगाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षीचा बैलपोळा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे
पुरंदर तालुक्यात सध्या लंपी रोगाचा शिरकाव झाला आहे. तालुक्यात आज अखेर २८ जनावरे लंपी बाधित आढळली आहेत.त्यामुळे पंचायत समिती पुरंदरच्या पशुसंवर्धन विभागाने यावर्षी बैल पोळा साजरा न करण्याचे आदेश दिले आहेत.या बाबतचे पत्र सरपंच ,पोलीस पाटील ,तलाठी यांना देण्यात आले आहे.
यानुसार पुरंदर तालुक्यातही या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे. या रोगाचा प्रसार वेगाने होत असल्याचे निदर्शनास आल्याने संपूर्ण महाराष्ट्र राज्य नियंत्रीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेले आहे.त्यामुळे लंम्पी चर्म रोगाचे नियंत्रण व प्रतिबंधासाठी गुरे/ म्हशीचा बाजार भरवणे, प्राण्यांच्या शर्यती लावणे, प्राण्यांची जत्रा भरवणे, प्राण्यांचे प्रदर्शन आयोजीत करणे इत्यादीसाठी बंदी घालण्यात आलेली आहे. ही बाब विचारात घेता बैलपोळा सणानिमित्त गावातील बैल मोठया प्रमाणावर एकत्र येऊन त्यांची मिरणुक काढली जाते. परंतु सध्याच्या परिस्थितीत असे झाल्यास लंम्पी चर्मरोग प्रसार मोठ्या प्रमाणावर होईल, त्यामुळे तालुक्यातील सर्व गावांमध्ये लम्पी चर्मरोग प्रसार रोखण्यासाठी बैलपोळा सणानिमित्त गावातील बैल एकत्र आणण्यास बंदी घालण्यात येत आहे. तरी ग्रामपंचायतीनी नोटीस बोर्ड, फलेक्स किंवा दवंडी देवून सर्व पशुपालकांना याबाबत अवगत करावे. अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
प्राण्यांमधील संक्रमक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ मधील कलम ४ नुसार पशुपालक इतर व्यक्ती यांनी रोग प्रादुर्भावाबाबत काळजी घेणे बंधनकारक राहील. तसेच अधिनियमातील बाबीचे उल्लंघन झाल्यास कलम ३९, ३२ व ३३ मधील तरतुदीनुसार कारवाई करणेसाठी पोलीस पाटील यांनी पशुसंवर्धन विभागास सहाय्य करावे. असे आदेशात म्हटले आहे