रोख ठोक अजित पवार… निवडणूक होऊ द्या, पाणी का पाणी, दूध का दूध होईल.

लोकशाही सध्या अडचणीत आणलेली आहे. त्यातून दसऱ्यासारख्या दिवशी काय राजकारण झालं हे महाराष्ट्रानं पाहिलं आहे. आता एक निवडणूक होवू द्या, दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. समाज कुणासोबत, मतदार कुणासोबत हे सगळ्यांनाच कळेल. जेवढे पक्ष आहेत त्यांच्यासह जनतेलाही कळेल, असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपला लगावला आहे. ते बारामतीतील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे गटासह भाजपवर टीका केली. शिवाय शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयावर देखील आपली भूमिका मांडली.

अजित पवार म्हणाले, “असा निकाल येईल असं वाटलंच होतं. मागचे निकाल पाहता बैलजोडीच्या वेळी सिंडीकेट-इंडिकेट झालं, त्यावेळी बैलजोडी गोठवून दुसरं चिन्ह दिलं. त्यानंतर गाय वासरु गोठवून पंजा आणि राष्ट्रवादीला घड्याळ ही चिन्ह दिलं. नांगरधारी शेतकरी किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारची चिन्हे असतील. जनसंघाचे पणती चिन्ह होतं. ते जनता पक्षात गेल्यावर नांगरधरी शेतकरी चिन्ह दिलं. नंतर मग कमळ दिलं. अशा घटना मागे झालेल्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्राला माहितीय की शिवसेना हा पक्षच बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेला पक्ष आहे. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने तो अधिकार निवडणूक आयोगाला दिला आणि निवडणूक आयोगाने असा निकाल देवून सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपाचा देखील अजित पवार यांनी समाचार घेतला. फडणवीस यांचं म्हणणं धांदांत खोटं आहे, असे अजित पवार यांनी म्हटलं आहे. “राष्ट्रवादी हा एक व्यावसायिक पक्ष आहे, आधी त्यांनी शिवसेनेला पूर्णपणे कमकुवत केले आणि नंतर पक्ष फोडण्यास भाग पाडले. त्यानंतर आता राष्ट्रवादी ही पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. तर भाजप नेते राम कदम यांचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे असे अजित पवार यांनी म्हटले आहे. शिवसेनेचं चिन्ह गोठवल्यावर बारामतीत फटाके फुटत आहेत असं राम कदम यांनी म्हटलं होतं.

विजय शिवतारे यांनी केलेल्या आरोपावर बोलताना अजित पवार म्हणाले, कुणाच्याही आलतूफालतू आरोपाला उत्तर द्यायला मी काही बांधिल नाही. महागाईचा मुद्दा बाजूला ठेवला जातोय. त्यावर काही बोलत नाहीत. बेरोजगारीचा मुद्दा बाजूला ठेवतात. वेदांता प्रकल्प बाहेर गेला त्यावर काही बोललं जात नाहीत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर हे सरकार अपयशी ठरले आहे. हे अपयश झाकण्यासाठी नव नवीन घोषणा करतात आणि जनतेचे लक्ष वळवतात. शेतकऱ्यांना मदत होत नाही याबद्दल ठाम बोलत नाहीत. गॅस दरवाढ, महागाई यावर बोलत नाहीत.

“मध्यावधी निवडणुका लागणार नाहीत. पण आता अंधेरीत पोटनिवडणूक होतेय, त्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवार दिलाय. त्याला आम्ही पाठिंबा दिलाय. कॉंग्रेसही त्याबद्दल सकारात्मक निर्णय घेईल, अशी अपेक्षा आहे. त्यातून मुंबईतली जनता ठरवेल.
हे जे काही सुरु आहे ते बरोबर नाही. संविधान मानायचं नाही. कायदे नियम पायदळी तुडवायचे. फोडाफोडी, तोडातोडी हे बरोबर नाही, असे अजित पवार म्हणाले.

अजित पवार म्हणाले, “२०२४ उजाडू द्या. त्यावेळी निवडणुका लागल्यानंतर कळेल. मात्र २०१९ मध्ये नरेंद्र मोदी यांच्यासह बाळासाहेब ठाकरे यांचाही फोटो होता. निवडणूक काळातील शिवसेना उमेदवारांचे पोस्टर मी पाहिलेत. त्यावर दोघांचेही फोटो होते. ते शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार होते. त्यामुळे त्यामध्ये मोदींचाही फोटो होता. आता प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने भूमिका मांडणार. त्यातून फार काही मिळू शकत नाही. पण आता होणाऱ्या पोटनिवडणुकीतून कळेल. मुंबईत होणाऱ्या पोटनिवडणुकीत आता बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे फोटो लावून निवडणूक होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page