रिसे येथील मुकाई मंदिरात चोरी, पाऊण लाखांची चांदीचा ऐवज गायब
जेजुरी, दि. ९ रिसे, ता.पुरंदर येथील ग्रामदैवत मुकाई मंदिरात काल रात्री अज्ञात चोरट्याने चोरी करून सुमारे पाऊण लाखांची चांदी गायब केल्याची घटना घडली आहे. या संदर्भात विलास तुकाराम हांडे यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली आहे.
याबाबत जेजुरी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, काल दि.८ सायंकाळी सहा ते आज दि.९ पहाटे ५ वाजण्याच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने मुकाई देवीच्या मंदिराचे मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आतील गाभाऱ्याचे ही कुलूप तोडले. गाभाऱ्यातील देवीचे एक किलो वजनाचे अंदाजे २९००० रुपये किमतीचे मखर, एक किलो चांदीचा अंदाजे २९००० रुपये किमतीचा सिंह, तसेच देवीच्या डोक्यावरील अर्धा किलो वजनाची सुमारे १५००० रुपये किंमतीची छत्री असा एकूण ७३००० रुपयांचा ऐवज चोरून नेला
आज पहाटे फिर्यादी श्री हांडे देवीची पूजा करण्यासाठी मंदिरात गेले असता त्यांना हा प्रकार समजला. त्यांनी ग्रामस्थांना बोलावून झाल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर जेजुरी पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली आहे.
जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार चंद्रकांत झेंडे हे करीत आहेत.
यापूर्वीही गेल्याच महिन्यात २८ सप्टेंबर रोजी पुरंदर तालुक्यातील सोमुर्डी येथील भैरवनाथ मंदिरातील सुमारे चार लाख रुपयांच्या सोन्या चांदीच्या ऐवजाची चोरी झाल्याची घटना घडली होती. १५ दिवसातील ही दुसरी घटना असून या परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झालेले आहे.