राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणीही नाराज नाही. – पुरंदर रा कॉ. उपाध्यक्ष संदीप चिकणे
जेजुरी, दि. १ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एका विचाराने स्थापन झालेला आहे. देशाचे नेते व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांवर निस्सीम प्रेम करणारे कार्यकर्ते पुरंदर राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये आहेत. तालुक्यात पक्ष संघटना ही मजबूत आहे, पक्षाची ताकद ही मोठी आहे. यामुळे पक्षात नाराजी आहे असे म्हणणे चुकीचे असून कोणीही पक्षात नाराज नसल्याचे पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष संदीप चिकणे यांनी सांगितले.
काही वर्तमानपत्रात किंवा शोषल मीडियात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेकजण नाराज असून ते पक्षातून बाहेर पडण्याची शक्यता असल्याच्या बातम्या आल्या होत्या. अशा प्रकारच्या चुकीच्या पद्धतीने कोणी बातम्या पेरल्या असतील तर त्या चुकीच्या आहेत. पक्ष एकसंध आहे. कोणी पक्षाबाहेर जाणार नाही, उलट पक्ष बांधणी मजबूत होत असल्याचे ही त्यांनी सांगितले.
नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष माणिक झेंडे पाटील आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी ही पत्रकार परिषद घेऊन याबाबत खुलासा केला आहे. पक्ष बांधणीच्या माध्यमातून खांदे पालट होत असते. काही बदल करण्याच्या मागण्या होत्या. ते बदल करण्यात येत असल्याने चर्चा ही होणारच, मात्र कोणी नाराज झाले आहे असे काही ही नसल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शेतकरी, विध्यार्थी, युवक युवती महिला, दिव्यांग आदीसाठी वेगवेगळ्या माध्यमातून काम करीत असून पक्ष एकसंध असून निष्ठेने काम करीत असल्याचे तालुका अध्यक्ष माणिक झेंडे यांनी सांगितले.