राज्यात नवीन पर्वाची सुरुवात ….
उद्धव – बाळासाहेब एकत्र…
शिवशक्ती – भीमशक्ती ची आघाडी …
मुंबई, दि.२३ ( प्रतिनिधी )
गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु असलेल्या राजकीय चर्चांना आज अखेर पूर्ण विराम मिळाला आहे. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी दादरमधील आंबेडकर भवन येथे संयुक्त पत्रकार परिषद घेत शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येत असल्याची घोषणा केली आहे.
दोन दिवसांपासून स्वतः बाळासाहेब आंबेडकर यांनी केलेले सुतोवाच आणि ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांनी त्याला दिलेला दुजोरा पाहता, ही युती होणार अशी अटकळ होती. अशात सोमवारी (23 जानेवारी) सकाळीच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट करत या युतीबद्दल जवळपास खात्री वर्तवली होती. ‘शिवशक्ती आणि भीमशक्तीचा एल्गार, संयुक्त पत्रकार परिषद. २३ जानेवारी दुपारी १२. ३० वाजता. आंबेडकर भवन, नायगाव, दादर महाराष्ट्राच्या राजकारणातील नवे पर्व.’ अशा प्रकारचे ट्विट राऊत यांनी केले होते.
त्यानंतर दादरच्या आंबेडकर भवनात आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे एकत्र आले होते. सुरुवातीला दोन्ही पक्षाच्या प्रमुखांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर सडेतोड भाष्य केले, त्यानंतर शिवशक्ती-भीमशक्तीच्या एकत्र येण्याची गरज बोलवून दाखवत, राज्याच्या राजकारणातील नव्या पर्वाची नांदी ठरणाऱ्या या ऐतिहासिक युतीची घोषणा केली. यावेळी दोन्ही पक्षाचे अनेक मान्यवर, नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.