राज्यातील सत्ता संघर्ष प्रकरण याच आठवड्यात संपवायचे – सरन्यायाधीश डी. वाय.चंद्रचूड
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांच्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशांच्या नेतृत्त्वातील घटनापीठात आज पुन्हा सुनावणी सुरु झाली आहे. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड आणि न्या. एम. आर. शहा, न्या. कृष्णा मुरारी, न्या. हिमा कोहली आणि न्या. पी. एस. नरसिंहा यांच्या घटनापीठापुढे आजपासून पुन्हा सलग तीन दिवस सुनावणी सुरु राहणार आहे. ठाकरे-शिंदे यांच्यातील वादात ठाकरे गटाच्या बाजूने अभिषेक मनू सिंघवी आणि देवदत्त कामत यांनी युक्तिवादाला सुरुवात केली. सिंघवी यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर युक्तिवाद केला तर, देवदत्त कामत यांनी पक्षप्रतोद निवडीचा मुद्दा मांडला. घटनापीठानं जेवणासाठी ब्रेक घेण्यापूर्वी सरन्यायाधीशांनी आम्हाला हे प्रकरण या आठवड्यात संपवायचं असल्याचं म्हटलं
ठाकरे गटाकडून या प्रकरणी आतापर्यंत कपील सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी, देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला. देवदत्त कामत यांचा युक्तिवाद संपल्यानंतर आज सुप्रीम कोर्टाने जेवणासाठी ब्रेक घेतला. यावेळी सरन्यायाधीशांनी पुढील सुनावणीसंदर्भात चर्चा केली. एकनाथ शिंदे यांच्या बाजूनं नीरज किशन कौल, महेश जेठमलानी, मनिंदर सिंग, महाधिवक्ता तुषार मेहता युक्तिवाद करतील. त्यानंतर कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी पुन्हा युक्तिवाद करतील, असं सरन्यायाधीशांनी सांगितलं. आम्हाला हे प्रकरण याच आठवड्यात संपवायचं आहे, असं सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले.
महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षात शिंदेंच्या बाजूनं २ मार्च रोजी ४ पर्यंत युक्तिवाद करण्यात येणार आहे. शिंदे गटाचा युक्तिवाद आज दुपारपासून सुरु होणार आहे. त्यानंतर २ ते ४ च्या दरम्यान ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी पुन्हा युक्तिवाद करतील. त्यानंतर घटनापीठाकडून निकाल राखून ठेवला जाण्याची शक्यता आहे. युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर दोन आठवड्यात निकाल लागण्याची शक्यता आहे, असं तज्ज्ञांचं मत आहे.