राज्यपाल कोश्यारी यांच्या निर्णयांची चौकशी व्हावी ; शरद पवार यांची प्रतिक्रिया
व र्धा: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राज्यपाल पदाचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यपाल कोश्यारी यांनी राजीनामा दिल्याने महाराष्ट्राची सुटका झाली आहे. पण राज्यपाल म्हणून त्यांनी संविधान विरोधी निर्णय घेतले असतील तर त्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे. त्यामुळे नवे राज्यपाल रमेश बैस हे कोश्यारी यांनी घेतलेल्या निर्णयाची चौकशी करणार का? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. मात्र, पवार यांच्या या मागणीमुळे भाजपची कोंडी झाल्याचं सांगितलं जात आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. नवे राज्यपाल आले आहेत. त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे? राज्यपाल कोश्यारी यांनी संविधान विरोधी निर्णय घेतले होते. त्याची चौकशी झाली पाहिजे का? असा सवाल शरद पवार यांना करण्यात आला होता. त्याला उत्तर देताना पवार म्हणाले की, संविधानाच्या विरोधात जे काही झालं असेल त्याची चौकशी व्हावी.
केंद्र सरकारने राज्यपाल कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करून चांगला निर्णय घेतला आहे. हा निर्णय आधीच घ्यायला हवा होता. पण तो आता घेतला. महाराष्ट्राची सुटका झाली. महाराष्ट्राच्या इतिहासात अशी व्यक्ती राज्यपाल झाली नव्हती. ती झाली. पण केंद्राने निर्णय घेतला ही चांगली बाब आहे, असं शरद पवार म्हणाले.
विशेष म्हणजे राज्यपाल कोशारीना नुकत्याच झालेल्या १३ राज्यपालांच्या यादीत स्थान नसल्याने त्यांना राजकीय विजनवासात पाठवल्याचीच चर्चा राजकीय वर्तुळातून आहे