येळकोट येळकोट जय मल्हार च्या जयघोषाने जेजुरी नगरी दुमदुमली, जेजुरीत दोन लाखांवर भाविकांची गर्दी.
जेजुरी, दि. २० महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबाच्या जेजुरीत आज दोन लाखांवर भाविकांनी गर्दी केली होती. येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट च्या जयघोषात भंडार खोबऱ्याच्या उधळणीत भाविकांनी कुलदैवताचे दर्शन घेतले. सोमवती यात्रा उत्सवाने जेजुरी नगरीला सोन्याच्या जेजुरीचे स्वरूप आले होते.
परवाची महाशिवरात्र, कालची शिवजयंती आणि आज सोमवती अमावस्या यात्रा असल्याने तीन दिवस जेजुरीत भविकांची प्रचंड गर्दी होती. राज्यभरातून आलेल्या भाविकांनी येथे येऊन कुलदैवताची वर्षाकाठची वारी पूर्ण केली. अनेकांनी जागरण गोंधळ आदी कुलधर्म कुळाचाराचे धार्मिक विधी ही पूर्ण केले.
काल रविवारी ४.१९ वा अमावस्या सुरू झाली होती.आज दुपारी १२.३६ वा पर्यंत अमावस्येचा पर्व काळ असल्याने दुपारी पूर्वीच सोमवती अमावस्येचे देवाचे कऱ्हा स्नान उरकने आवश्यक होते. यामुळे आज सकाळी ७ वाजता म्हाळसाकांताच्या उत्सवमूर्तींचा पालखी सोहळा कऱ्हा स्नानासाठी काढण्यात आला. देवाचे मानकरी पेशव्यांनी इशारत केल्यानंतर खांदेकरी मानकरी ग्रामस्थांनी उत्सवमूर्तींची पालखी उचलली. मुख्य गडकोटाला प्रदक्षिणा घालून देवाच्या पुजारी सेवेकाऱ्यांनी उत्सवमूर्ती पालखीत ठेवल्या. सनई चौघड्याचे मंजुळ स्वर सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जयमल्हारचा जयघोष, भंडार खोबऱ्याची प्रचंड उधळण, बंदुकीच्या फैरी याने संपूर्ण गडकोट दुमदुमून गेला. गडकोटात गर्दी करून असलेल्या भाविकांनी हा वीरश्रीपूर्ण चैतन्य सोहळा याची देही याची डोळा अनुभवला.
सोहळ्याने याच जल्लोषात गडकोटातून कऱ्हा स्नानासाठी प्रस्थान ठेवले. उत्सवमूर्तींचा पालखी सोहळा मुख्य पायरी मार्गावरून नंदी चौक मार्गे चिंच कोटातील ऐतिहासिक गौतमेश्वर मंदिरात पोहोचला. याठिकाणचा मान स्वीकारून सोहळ्याने जाणाई चौक मार्गे मुख्य शिवाजी चौकातून कऱ्हा नदीकडे कूच केले. साडे ११ वाजता सोहळा कऱ्हा स्नानासाठी रंभाई शिंपीन मंदिर घाटावर पोहोचला. देवाचे उपाध्ये, पुजारी मानकरी सेवेकाऱ्यांनी या ठिकाणी उत्सवमूर्तींना विधिवत कऱ्हेच्या पाण्याने स्नान घालण्यात आले.
याठिकाणी धालेवाडी ग्रामस्थांनी रंभाई शिंपीन ट्रस्ट च्या माध्यमातून यावर्षीपासून कऱ्हा स्नानाची उत्कृष्ट सुविधा निर्माण केली होती. कऱ्हा स्नानानंतर सोहळ्याने माघारीचे प्रस्थान ठेवले. कोथळे, धालेवाडी, कोरपड मळा ठिकठिकाणच्या मानकऱ्यांचा मान स्वीकारीत सोहळा जेजुरीतील जाणाई मंदिराच्या प्रांगणात पोहोचला. याठिकाणी ग्रामस्थ व परिसरातील भाविकांनी देवदर्शन घेतले. रात्री उशीरा सोहळा गडकोटात पोहोचला.
सोहळा यशस्वी व्हावा म्हणून मार्तंड देव संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप, व्यवस्थापक सतीश घाडगे, गणेश डीखळे, खांदेकरी मानकरी ग्रामस्थ मंडळाचे पदाधिकारी आदिंनी नियोजन केले होते. जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश तावस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.