यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे खानवडी येथे मंगळवारी महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबीर…
पुरंदर, दि. ३१ (प्रतिनिधी) – महात्मा जोतिबा फुले यांचे मूळ गाव पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे यशवंतराव चव्हाण सेंटर आणि मासूम या सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी येत्या मंगळवारीआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून हे आरोग्य शिबीर घेण्यात येणार आहे. महिलांची तपासणी करून आवश्यक वैद्यकीय सल्ला तसेच मार्गदर्शन करण्यात येणार आहे. मासूम या सामाजिक संस्थेच्या प्रशिक्षित महिलांची टीम यावेळी तपासणीसाठी आवश्यक ती सर्व मदत करणार आहे. गरजेनुसार काही प्राथमिक आणि तातडीचे उपचार शिबिरातच करण्यात येतील. मंगळवारी (दि. ३) सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत हे शिबीर होणार आहे. या शिबिरात जास्तीत जास्त महिलांनी सहभागी होऊन आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.
लाल, पांढरे अंगावरुन जाणे, अंग बाहेर येणे, मायांगाला खाज येणे, उन्हाळी लागणे या आजारांची याचबरोबर गर्भाशय मुखाची कॅन्सर पूर्व तपासणी व स्तनांची तपासणी या शिबिरात केली जाणार आहे. याशिवाय हिमोग्लोबिन आणि स्पेक्युलम तपासणी सुद्धा या शिबिरात होणार असून जास्तीत जास्त महिलांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन खासदार सुळे यांनी केले आहे.