विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजावी – बबन पोतदार लेखक आपल्या भेटीला उपक्रम
जेजुरी, दि.२ वाचन ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे,त्यामुळे मुलांनी दररोज नवनवीन अवांतर पुस्तके वाचावीत,वाचनाने आपले ज्ञान समृद्ध होते.डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते ‘वाचाल तर वाचाल’ या उक्तीप्रमाणे नवीन पिढीला वाचनाची सवय लागावी, चांगला श्रोतृवर्ग निर्माण व्हावा,मुलांच्यामध्ये वाचन संस्कृती निर्माण व्हावी,असे प्रतिपादन ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक बबन पोतदार यांनी साकुर्डे येथे केले.
साकुर्डे ता.पुरंदर येथील मातोश्री जिजाई जाधव हायस्कुल मध्ये “लेखक आपल्या भेटीला” हा या उपक्रमाअंतर्गत जेष्ठ साहित्यीक बबन पोतदार यांच्या व्यख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी विद्यार्थ्यांशी बोलताना ते पुढे म्हणाले, ‘ आपण चांगले ऐकले तर चांगले बोलू शकतो, चांगले बोललो तर चांगले लिहू शकतो,आत्ताची पिढी बुद्धिमान आहे,त्या मुलांपुढे आपण चांगले विचार ठेवू शकलो तर निश्चित भावी पिढीत चांगले साहित्यिक निर्माण होतील.
श्री. पोतदार यांनी मुलांना विविध विनोद व गोष्टी सांगून मनमुराद हसविले,शिवाय त्यांनी विद्यार्थ्यांना सुविचार पुस्तिका तसेच काही पुस्तके भेट देऊन त्यांचा सत्कार केला . त्यांच्यासमवेत नूतन मराठी विद्यालय पुणे येथील सेवानिवृत्त पर्यवेक्षक भरत सुरसे, दिनेश देवकर व विद्या महामंडळ प्रशाला कोथळे चे सेवानिवृत्त मुख्याध्यापक काशिनाथ भोंग उपस्थित होते.
मुख्याध्यापक गणेश कामथे यांनी स्वागत केले, जेष्ठ शिक्षक रविंद्र शिंदे यांनी सूत्रसंचलन, तर पुणे जिल्हा टी. डी. एफ. चे कार्याध्यक्ष तानाजी झेंडे यांनी आभार मानले.
नियोजन सुरेश गरुड, अनिल जगताप, दत्तात्रय शिंदे, मापन्ना बनसोडे व विद्या पवार यांनी केले.