मोठी बातमी!
शिवाजी पार्कवर यंदा दसरा मेळावा होणार नाही; पालिकेनं दोन्ही गटांना परवानगी नाकारली!आता लक्ष उच्च न्यायालयातील सुनावणीकडे!
मुंबई, दि.२२ (प्रतिनिधी) गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेली शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची चर्चा एकीकडे थेट उच्च न्यायालयापर्यंत पोहोचली असताना दुसरीकडे मुंबई पालिकेनंच यासंदर्भात मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई महानगर पालिकेनं एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना या दोन्ही बाजूंना शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी नाकारली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा पुढे करत ही परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या अभिप्रायाच्या आधारे ही परवानगी नाकारण्यात आल्याचं पालिकेकडून जारी करण्यात आलेल्या पत्रातून दिसून येत आहे. या पार्श्वभूमवीर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली असून आता शिवसेनेनं उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
‘दोन्ही परस्परविरोधी अर्जदारांनी छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानात दसरा मेळावा आयोजित करण्यास परवानगी मिळण्यासाठी अर्ज केले. मात्र, कोणत्याही एका अर्जदाराला त्यासाठी परवानगी दिल्यास त्यातून शिवाजी पार्कच्या संवेदनशील परिसरामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो’, असं स्पष्टीकरण परवानगी नाकारताना प्रशासनाकडून देण्यात आलं आहे.