मुख्यमंत्री शिंदेंचे तीन डुप्लिकेट, दोन सापडले, तिसऱ्याचा शोध सुरू…
पुणे, दि.२२ (प्रतिनिधी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डुप्लिकेट व्यक्तींचे दिवसेंदिवस वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
त्यामुळे मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलिन होत असल्याचा आरोप करत संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल झाला. मुख्यमंत्र्यांच्या एकूण तीन डुप्लिकेटपैकी विजय माने व भीमराव माने यांची ओळख पटली आहे. तर तिसऱ्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे हे पूर्वी रिक्षाचालक होते. त्यामुळे पिंपरी- चिंचवडमधील रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांचा तरुणपणाचा फोटो मुख्यमंत्र्यांचा फोटो म्हणून व्हायरल झाला होता. त्यानंतर पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील विजय माने हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखी वेशभूषा करून फिरतो. नुकताच त्याचा व सराईत गुन्हेगार शरद मोहोळसोबत सीएम वेशभूषेतील फोटो व्हायरल झाला. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर खंडणीविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे व उपनिरीक्षक मोहनदास जाधव यांनी या फोटोबाबत माहिती घेऊन गुन्हा दाखल केला.
सांगली येथील जिल्हा परिषदेच्या एका सदस्याने स्पर्धा आयोजित केली होती. त्याठिकाणी तमाशा देखील ठेवण्यात आला होता. त्या तमाशात सांगलीत दुसरा डुप्लिकेट मुख्यमंत्री म्हणून भीमराव माने याने मुख्यमंत्री शिंदे यांच्यासारखी वेशभूषा केली. तो या कार्यक्रमात नाचताना दिसून आला. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने त्याच्यावर कारवाई सुरू आहे.
राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखी वेशभूषा करून डुप्लिकेट सीएम म्हणून मिरवतात. हे डुप्लिकेट नाचगाण्यात अन् गुंडांसोबत वेगवेगळ्या प्रकारे फोटो व व्हिडीओ काढतात, ते व्हायरल करतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या लौकिकास बाधा आणल्याचे दिसून येते. त्यामुळे त्यांचा शोध घेऊन कारवाई सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.