मुंबई जिंकण्याचे अमित शहांचे आव्हान उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार – उद्धव ठाकरे
मुंबई , दि.८ देशातले सर्वाधिक बजेट असलेल्या मुंबई महापालिकेवर पक्षाचा झेंडा फडकावण्याचे भाजपचे मिशन असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काल मुंबईच्या दौऱ्यावर होते. लालबागच्या राज्याचे दर्शन घेतल्यानंतर अमित शहा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर मुंबई महापालिका काबीज करण्यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांना १५० जागा निवडून आणण्याचे टार्गेट दिले आहे.
तसेच यापुढे मुंबईच्या राजकारणात भाजपचे वर्चस्व राहिले पाहिजे, असा सल्लाही दिला. यावर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अमित शहांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांना १५० जागा निवडून आणण्याचे टार्गेट दिले. तर आता उद्धव ठाकरे यांनी अमित शाहा यांचे हे आव्हान स्वीकारले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपाला अस्मान दाखवून देऊ, असे प्रत्युत्तर उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. एकनाथ शिंदे गट आणि भाजपा एकत्र निवडणुका लढवणार असून, त्यांना १५० जागांचे टार्गेट अमित शाहा यांनी दिले आहे. तर शिवसेनेनेही १५० जागांचेच टार्गेट ठेवलेले आहे. त्यामुळे येत्या काळात हा वाद आणखी रंगण्याची शक्यता आहे.
दरम्यान, यावेळी पुढे दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार, असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी ठासून सांगितले. दसरा मेळाव्यात सगळ्यांचा समाचार घेणार असल्याचेही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले आहे. यावेळी मुख्यमंत्री नसण्यानं बोलण्यावर मर्यादा नसेल, मुख्यमंत्रीपदाचा मास्क तोंडावर नसेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. शिवसेनेची एकूण टीम वाढवायची आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.