मिठाई विक्रेत्यांवर कारवाई, अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
पुणे, दि. ५ : अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्यावतीने मंचर येथील महावीर डेअरी अॅन्ड स्वीट मार्टने अस्वच्छ परिस्थितीत खवा व गुजरात बर्फी साठविल्यामुळे तसेच चाकण येथील दोन मिठाई विक्रेत्यांनी मिठाई ट्रे वर ‘बेस्ट बिफोर’ दिनांक नमूद केले नसल्याचे आढळून आल्याने त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्यावतीने महावीर डेअरी अॅन्ड स्वीट मार्ट, मंचर या स्वीट मार्टवर धाड टाकून अस्वच्छ परिस्थितीत साठविलेला खवा व स्वीट खव्याचे (गुजरात बर्फी) दोन नमुने घेऊन उर्वरित २३ हजार ८०० रुपये किंमतीचा ११९ किलो खवा आणि ५ हजार ६०० रुपये किंमतीचा २८ किलो स्वीट खवा (गुजरात बर्फी) असा एकूण २९ हजार ४०० किंमतीचा साठा जप्त केला. स्वीट खवा आणि गुजरात बर्फी ही साखर, दूध पावडर, खाद्यतेल आदी घटक पदार्थांपासून बनविण्यात आल्याचे लेबलवरुन स्पष्ट होते.
सर्व मिठाई विक्रेत्यांनी दुकानात विक्रीसाठी ठेवलेल्या मिठाईच्या ट्रे वरती ‘बेस्ट बिफोर’ दिनांक नमूद करावा व मिठाई बनविण्यासाठी भेसळयुक्त स्वीट खवा (गुजरात बर्फी) चा वापर करु नये, दुधापासून बनविलेल्या चांगल्या दर्जाच्या खव्याचा वापर करावा. स्वीट खवा(गुजरात बर्फी) चा वापर करुन मिठाई बनवित असल्याचे आढळल्यास मिठाई विक्रेत्यावर कारवाई करण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त संजय नारागुडे यांनी कळविले आहे.