मार्तंड देव संस्थान विश्वस्त निवडी विरुद्धजेजुरीकरांकडून साखळी उपोषण.. बाहेरगावच्या पाच ही विश्वस्त निवडी रद्द करण्याची मागणी…
जेजुरी,दि. २७ श्री मार्तंड देवसंस्थान नवनियुक्त विश्वस्त मंडळाच्या निवड प्रक्रियेला विरोध करत सुरू केलेल्या साखळी उपोषणात खंडेरायाचा जागर करीत धर्मादाय सहआयुक्त कार्यालयाचा निषेध करण्यात आला…
समस्त जेजुरीकर ग्रामस्थ-खांदेकरी मानकरी सेवेकरी यांच्या वतीने नवनियुक्त विश्वस्त निवडीच्या विरोधात गुरुवार ( दि.२६) पासून साखळी उपोषण सुरू केले असून आज गावचे माळवदकर पाटील परिवार यामध्ये सहभागी झाला होता.शहरातील सर्व स्वयंसेवी संस्था ,गणेश मंडळे टप्प्याटप्प्याने सहभागी होणार असून जोपर्यंत धर्मदाय सहआयुक्त बाहेरगावातील पाच विश्वस्त बरखास्त करून गावातील पाचजण नियुक्त करत नाहीत तोपर्यंत आंदोलनाची तीव्रता वाढविण्यात येणार आहे.
निवडीच्या निकषाना तिलांजली दिल्याचा ग्रामस्थांचा आरोप
विश्वस्त पदासाठी कोणीही राजकीय दबाव वा शिफारस आणू नये .तसे केल्यास त्या व्यक्तिविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येऊन सदर व्यक्तीला निवड प्रक्रियेतून बाद करण्यात येईल अशी सूचना लावलेली आहे ,असे असताना एकाच सत्ताधारी पक्षाच्या व त्यांच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या निवडी कशा झाल्या? असा आरोप ग्रामस्थांतून होत आहे.
याशिवाय विश्वस्तपदासाठी पोलीस चौकशी अहवाल घेतला जात असतो. अर्ज सादर दाखल करीत असताना अर्जदारविरुद्ध गुन्हा दाखल किंवा दंड /शिक्षा झाले नसल्याचे प्रतिज्ञापत्र घेण्यात आले होते.असे असतानाही नवनियुक्त विश्वस्तांमधील काही व्यक्तींनी खोटी चुकीची माहिती सादर केली असावी अथवा राजकीय हस्तक्षेप झाल्याने त्यांची चौकशी केली नसावी अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे