मार्तंड देवसंस्थान नवनियुक्त विश्वस्त निवडीचा वाद चिघळला.ग्रामस्थ रस्त्यावर…
जेजुरी ,दि.२६ महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या खंडेरायाचे व्यवस्थापन पाहणाऱ्या मार्तंड देवसंस्थान समितीवरील विश्वस्त निवडीचा वाद चिघळला असून नवनियुक्त विश्वस्त मंडळ निवड प्रक्रियेचा निषेध करत … राजकीय हस्तक्षेप होत निवड झालेले विश्वस्त मंडळ बरखास्त करा. आणि प्राधान्याने स्थानिक जेजुरीकर ग्रामस्थांमधील सामाजिक कार्यकर्ते व अभ्यासू व्यक्तींची निवड करा .अशी मागणी सर्वपक्षीय पदाधिकारी व ग्रामस्थांनी गुरुवारी(दि.२५)ऐतिहासिक चिंचबागेतील गौतमेश्वर छत्री मंदिर येथे घेण्यात आलेल्या बैठकीत केली.
शुक्रवारी (दि.२६) सकाळी १० वा. छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध सभेचे आयोजन करण्यात आले.
यावेळी खांदेकरी मानकरी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जालिंदर खोमणे ,मानकरी राजेंद्र पेशवे,सचिन पेशवे ,१२ बलुतेदार संघाचे अध्यक्ष सचिन खोमणे , माजी विरोधी पक्षनेते जयदीप बारभाई, माजी नगरसेवक हेमंत सोनवणे ,माजी विश्वस्त संदीप जगताप, शिवराज झगडे,पंकज निकुडे , सुधीर गोडसे,अविनाश भालेराव ,अजिंक्य देशमुख, अँड .अशोक भोसले ,ऑड. मंगेश जेजुरीकर, कृष्णा कुदळे, सुशील राऊत,दिलावर मनेर, राजेंद्र मोरे,नंदू निरगुडे ,दिगंबर उबाळे,उमेश जगताप,प्रसाद अत्रे, अलका शिंदे,गणेश आगलावे,रोहिदास जगताप,निलेश जगताप,प्रकाश खाडे ,मेहबूब पानसरे ,बंटी खान ,माधव बारभाई , विठ्ठल सोनवणे,प्रशांत लाखे, एन .डी. जगताप ,आदींसह सर्वपक्षीय पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .
आज दुपारी १२ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ग्रामस्थांकडून मुख्य शिवाजी चौकात रास्ता रोको करण्यात आला. त्यानंतर मुख्य चौकातून निषेधाच्या घोषणा देत शहरातील मुख्य रस्त्यावरून पदयात्रा काढण्यात आली व देवसंस्थान कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले.
जेजुरीच्या खंडेरायाच्या जत्रा यात्रा उत्सव ,रूढी परंपरा व धार्मिक विधींचा अभ्यास नसलेल्या व राजकीय वरदहस्त असलेल्या नवनियुक्त विश्वस्त मंडळातील बाहेर गावच्या पाच सदस्यांची निवड रद्द करावी.पुन्हा निवड प्रक्रिया राबवून ग्रामस्थांना संधी ध्यावी .किंवा ग्रामस्थांमधील किमान चार सदस्य निमंत्रित म्हणून घ्यावेत ,सध्याचे अस्तित्वात आलेले विश्वस्त मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमून कारभार सुरू करावा. जोपर्यंत मागण्या मान्य होऊन न्याय मिळत नाही तोपर्यंत विश्वस्तांना काम करू देणार नाही. आदी प्रमुख मागण्या ग्रामस्थ मंडळातील पदाधिकारी यांनी केल्या आहेत.
रात्रीच्या वेळी पदभार स्वीकारला …
दरम्यान, गुरुवारी (दि.२५) रात्री ग्रामस्थ मंडळाची बैठक संपल्यानंतर व रात्री ९ वाजता खंडेरायाची शेजारती होऊन गडाचे दरवाजे बंद झाल्यानंतर रात्री १० वाजण्याचे सुमारास नवनियुक्त पाच विश्वस्तांनी कार्यालयात दाखल होऊन स्वाक्षरी करत पदभार स्वीकारला .ग्रामस्थांना ही घटना समजताच त्यांनी भक्तनिवास समोर धाव घेत विश्वस्तांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या .देवाच्या सेवेचा पदभार स्वीकारायला रात्रीची वेळ का निवडली असा संतप्त सवालही ग्रामस्थांनी उपस्थित केला.
न्यायालयीन लढा देण्याचीही तयारी …
विश्वस्तांची निवड करणारे धर्मदाय सहआयुक्त हे जिल्हा न्यायाधीश असतात .त्यांना निवड रद्द करण्याचा अधिकार आहे.तसे मागणीचे पत्र त्यांना दिलेले आहे .त्यांच्याकडून ग्रामस्थांची मागणी फेटाळली गेली तर ग्रामस्थांच्या वतीने उच्चन्यायालयात दाद मागण्यात येणार असल्याचे माजी नगरसेवक हेमंत सोनवणे यांनी सांगितले.
बाहेरगावातील विश्वस्तांचा सत्कार स्वागत करणार नाही…….
बाहेरगावातील व राजकीय वरदहस्त असलेल्या पाच विश्वस्तांचे स्वागत सत्कार करण्यात येणार नाही ,अथवा सार्वजनिक कार्यक्रमाना निमंत्रित करण्यात येणार नाही .कोणत्याही स्वरूपाचे सहकार्य करणार नाही. ग्रामस्थ मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.