मान्सून पुन्हा सक्रिय, मुसळधार पावसाची शक्यता
पुणे, दि.७ मान्सून सक्रिय नसल्याने पावसामध्ये आलेल्या खंडानंतर गुरुवारपासून राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. बुधवारपर्यंत राज्यात गडगडाटासह पावसाची शक्यता असून त्यानंतर गुरुवार-शुक्रवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात होईल. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात शुक्रवारी तुरळक ठिकाणी अती मुसळधार पावसाची शक्यता आहे.
अरबी समुद्रामध्ये मान्सून पुन्हा सक्रिय होत असून वाऱ्यांची क्षमता सध्या मध्यम ते तीव्र आहे. मान्सून ट्रफचा पूर्वेकडील भाग दक्षिण दिशेने सरकण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली. यासोबतच कर्नाटकच्या दक्षिणेकडे चक्रीय वातस्थिती निर्माण झाली आहे. बुधवारी बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीय वातस्थिती निर्माण होऊ शकते. या प्रभावाअंतर्गत त्यानंतरच्या ४८ तासांमध्ये पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊ शकते. या प्रणालींमुळे राज्यामध्ये पावसाचा जोर पुन्हा वाढू शकतो, असे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले.
पालघर, ठाणे, मुंबई येथे शुक्रवारपासून तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे. मंगळवारी जारी करण्यात आलेल्या पुढील पाच दिवसांच्या अंदाजानुसार शुक्रवारी अनंत चतुर्दशीला विसर्जनाच्या दिवशी मुंबईकरांना तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे बुधवारी मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो, मात्र गुरुवारपासून मुसळधार ते अती मुसळधार पावसाची तुरळक ठिकाणी शक्यता आहे. नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड येथेही शुक्रवारी पावसाचा जोर वाढू शकतो. शुक्रवारी सातारा, परभणी, नांदेड येथे तुरळक ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भात या दिवशी चंद्रपूर, गडचिरोली येथे ऑरेंज अॅलर्टही जारी करण्यात आला आहे. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा अंदाज आहे.