महावितरण विरुद्ध आमरण उपोषण सुरू…. हा लढा सर्वसामान्यांसाठी, शेतक-यांसाठी आहे :- आमदार संजय जगताप
सर्व अडचणी सोडवा… तोपर्यंतच थांबणार उपोषण सुरू राहणार…...
सासवड दि. ४ बी एम काळे
पुरंदर तालुक्यातील महावितरण कंपनीच्या अधिका-यांचा भ्रष्टाचार, अरेरावीचे धोरण, अकार्यक्षमता याच्या विरोधात सुरू केलेले आमरण उपोषण आणि जन आंदोलन हे सर्वसामान्य नागरीक आणि शेतकऱ्यांच्या प्रत्येक अडचणीची सोडवणूक होईपर्यंत सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करीत पुरंदर हवेलीचे आमदार संजय चंदूकाका जगताप यांनी हा लढा समाजातील प्रत्येक घटकासाठी आहे असे सांगत आमरण उपोषणावर ठाम असल्याचे सांगितले.
सासवड येथील शिवतीर्थावर सोमवारी ( दि ३ ) आमदार संजय जगताप यांनी महावितरण कंपनीच्या अधिका-यांचा भ्रष्टाचार, अकार्यक्षमता आणि भोंगळ कारभाराबाबत आमरण उपोषण आणि जन आंदोलन सुरू केले. यावेळी पुरंदर - हवेलीतील अनेक गावे, विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि शेकडो शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांनी शिवतीर्थावर उपस्थित राहून आमदार संजय जगताप यांच्या आमरण उपोषणाला जाहीर पाठिंबा देत महावितरण कंपनीच्या विरोधात रोष व्यक्त केला. नागरीक आणि शेतकऱ्यांकडून विविध कामांसाठी घेतलेले पैसे परत करा अन्यथा त्या पैशांची पावती द्या अशी मागणी यावेळी आमदार संजय जगताप यांनी केली.
यावेळी बोलताना आमदार संजय जगताप यांनी, उपस्थित महावितरणच्या अधिकाऱ्यांपुढे सर्वसामान्य नागरिक, शेतकऱ्यांच्या आलेल्या तक्रारींचा पाढा वाचला. महावितरणचे अधिकारी, कर्मचारी आणि ठेकेदारांविरोधात अनेक तक्रारी आल्या आहेत. यातील अनेक बाबी माझ्याही निदर्शनास आल्या असून याबाबत वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांना लेखी आणि तोंडी सांगून त्यांच्या वर्तनात आणि कारभारात फरक पडला नाही. शासनाची मंजूर असलेली ८६ रोहित्र सर्वसामान्य नागरीकांसाठी न बसविता ती व्यावसायिक आणि कारखानदारांच्या सोयीसाठी भ्रष्टाचार करून बसविण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. विजजोड, खांब, तारा, मिटर देण्यास नेहमीच दिरंगाई होत आहे. दोन - दोन वर्षे घरगुती आणि शेती पंपासाठी विजजोड मिळत नाही. शेतीपंपाचे मिटर रीडिंग न घेता अंदाजे हजारो - लाखो रूपयांची वीजबील शेतकऱ्यांच्या माथी मारून ती भरण्यासाठी दबाव आणला जात आहे. या आणि यासारख्या अनेक अडचणी महावितरणकडून निर्माण करून ग्राहकांना मनस्ताप देण्यात येत असून महावितरणच्या या भोंगळ कारभाराचा आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांचा समाजातील सर्वच घटकांना होत असलेला त्रास थांबविण्यासाठी, अधिका-यांचा मुजोरपणा आणि भ्रष्ट कारभार मोडीत काढून त्यांना वठणीवर आणण्यासाठी मला नाईलाजाने आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला असल्याचे आमदार संजय जगताप यांनी सांगितले.
याप्रसंगी सुनिता बाळासाहेब कोलते, मनिषा सुजित बडदे, स्वाती तुकाराम गिरमे, राजगौरी सतिश जगताप, निलम सचिन होले, प्रकाश पवार, तुषार माहूरकर, विठ्ठलराव मोकाशी, अनिल जाधव, महेंद्र माने, गोरखनाथ खेडेकर, चंद्रकांत बोरकर, माणिक भोंडे, नितीन भोंगळे, सागर जगताप, संतोष जगताप आणि चंद्रकांत हिवरकर आमदार संजय जगताप यांसोबत आमरण उपोषणाला बसले आहेत.
याप्रसंगी नागरीक राजाराम साळुंखे, माजी उपनगराध्यक्ष संजय ग जगताप, सुभाष कुतवळ, हभप सोमनाथ वाघले, बु-हाणभाई इनामदार, डॉ दिपक जगताप, सुनील धिवार, बबूसाहेब माहूरकर, ठाकरे गट शिवसेनेचे तालुकाप्रमुख अभिजित जगताप, सरपंच मनिषा नाझीरकर, मनिषा मेमाणे, शेतकरी संघटनेचे दिलीप गिरमे, दिपक काकडे, प्रहार संघटनेच्या सुरेखा ढवळे, आण्णा खैरे, अॅड भास्कर जगदाळे, नंदकुमार जगताप, राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते विजयराव कोलते, तालुकाध्यक्ष माणिकराव झेंडे, सुदामराव इंगळे यांसह अनेकांनी मनोगतातून आंदोलनास पाठिंबा दिला. यावेळी प्रदीप पोमण, जि प सदस्य दत्ता झुरंगे, पं स सदस्या सुनीता कोलते, सोनाली यादव, अॅड गौरी कुंजीर, गणेश जगताप, विठ्ठलराव मोकाशी, सोमेश्वर साखर कारखान्याचे बाळासाहेब कामथे, आनंता तांबे, तुषार माहूरकर, विश्वासराव जगताप, दिलीप धुमाळ, राजेश काकडे, संदीप फडतरे, देविदास कामथे, हर्षदा पवार, वैशाली निगडे, भाग्यवान म्हस्के, शामकांत भिंताडे, संभाजी काळाणे यांसह विविध गावांचे सरपंच, सदस्य, विकास सोसायटीचे अध्यक्ष, संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विज आकार सांगता येईना
याप्रसंगी काही नागरीकांनी उपस्थित महावितरणच्या अधिकाऱ्यांना वीजबीलामधील स्थिर आकार, विज इकार, विज विक्रीकर, थकबाकी, इतर आकार याप्रकारे दिलेल्या विविध आकारांबाबत माहिती विचारली असता त्यांना याबाबत कोणतीही माहिती सांगता आली नाही.
अनेक संघटना, गावांचा उत्स्फुर्तपणे पाठिंबा
या आंदोलनासाठी पुरंदर – हवेलीतील बहुतांश सर्व गावांचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, सर्वसामान्य नागरीक, शेतकरी तसेच विविध संघटनांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला. प्रत्येकाला महावितरण कडून त्रास होत असल्याने आमदार संजय जगताप यांनी सुरू केलेल्या या आंदोलनाचे सर्वांनी कौतुक करत आंदोलनास पाठिंबा व्यक्त केला. प्रहार संघटना, शेतकरी संघटना, राष्ट्रवादीचे सर्व विभाग, वारकरी संघटना, पत्रकार संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती निरा, पुरंदर तालुका खरेदी विक्री संघ, बैलगाडा संघटना, मुस्लिम संघटना, राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान, मराठा महासंघ, पुरंदर मेडिकल असोसिएशन, बहुजन हक्क परिषद, विविध गावांच्या पाणी पुरवठा योजना, जिजामाता फळ व भाजीपाला विक्रेती संघटना, सासवडचे राज्य परिवहन महामंडळाचे पदाधिकारी आदी अनेक संघटनांनी आमदार संजय जगताप यांच्या उपोषणाला व या आंदोलनाला जाहीर पाठिंबा व्यक्त केला.
दिव्यांग कुटुंबाला हजारोंचे विजबिल
याप्रसंगी एक दिव्यांग कुटुंब तक्रार घेऊन आले होते. त्यांच्या घरात केवळ दोन बल्ब असून त्याचे विजबील तब्बल १४ हजार रुपये आले असल्याची तक्रार या कुटुंबाने येथे मांडली.
आतातरी कार्यक्षमता दाखवा….नागरीकांचे पैसे परत करा….
तालुक्यातील सर्वसामान्य नागरीक, शेतकरी, व्यावसायिकांकडून महावितरणविरोधात हजारो तक्रारी, अडचणी लेखी अर्ज तसेच ईमेल आणि मोबाईलवर मेसेज या माध्यमातून मिळाल्या आहेत. या अडचणी महावितरणकडे पाठविण्यात येत असून यातील प्रत्येक अडचण तात्काळ सोडवा…. आपली कार्यक्षमता दाखवा, कोणतीही कारणे देऊ नका…. सर्वसामान्य नागरिक, शेतक-यांकडून घेतलेले पैसे निमुटपणे माघारी द्या…. असे सांगत आमदार संजय जगताप यांनी महावितरणचा कारभार म्हणजे ” भिक नको पण कुत्र आवर” असा झाला आहे.