महाविकास आघाडीला धक्का, ती बारा आमदारांची यादी राज्यपालांकडून रद्द .
मुंबई दि.४ महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेत राज्यपालांकडून नियुक्त करण्यासाठी दिलेली आमदारांची यादी रद्द करण्यात आली आहे. राजभवनने मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवलेल्या पत्रात महाविकास आघाडी सरकारने पाठवलेली आमदारांची यादी रद्द करण्यात येत असल्याचं सांगितलं आहे. दरम्यान, काल मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडी सरकारने दिलेली जुनी यादी रद्द करण्यासाठी राज्यपालांकडे शिफारस केली होती. त्यानंतर राज्यपालांकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त उमेदवारांची यादी पाठवली होती. मात्र ही यादी रद्द करण्याची मागणी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल राज्यपालांकडे पत्राद्वारे केली होती. राज्यात आता सत्तांतर झालं आहे. त्यामुळे राज्यपाल नियुक्त जागांवर नवी नावं आपण देणार असल्याचं मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलं होतं.त्यामुळे नावांची जुनी यादी रद्द करावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली होती. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २०२० मध्ये विधान परिषदेतल्या १२ जागांसाठी राज्यपाल नियुक्त उमेदवारांची यादी पाठवली होती. पण राज्यपालांनी ही यादी मंजूर केली नाही. त्यामुळे विधान परिषदेतल्या १२ जागा आता रिक्त आहेत. या जागांवर शिंदेंचं सरकार आता नवीन नावं सुचवणार आहेत.
ठाकरे सरकारच्या या यादीला राज्यपालांकडून केराची टोपली दाखवण्यात आली असून शिंदे फडणवीस सरकारकडून आता १२ आमदारांना विधानपरिषदेवर नियुक्त करण्यासाठी यादी पाठवण्यात येणार आहे. यामध्ये कोणत्या नेत्यांची वर्णी लागणार याकडे लक्ष लागले आहे. शिंदे गटाला आणि भाजपला कितीचा कोटा मिळणार याकडेही लक्ष लागलेले आहे.