महाराष्ट्रात निवडणुकांचे बिगुल वाजले…निवडणूक आयोगाकडून घोषणा

मुंबई, दि.४ ( प्रतिनिधी) महाराष्ट्रात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. दोन महिन्यांपूर्वी अजित पवार सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर आता अजित पवार यांच्या नाराजीच्या बातम्या समोर आल्या आहेत. आज तर पुण्याचे पालकमंत्रीपद ही अजित पवारांना देण्यात आले. पाठोपाठ महत्वाची बातमी ही समोर आलीच. आजच राज्य निवडणूक आयोगाकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे.
राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.

“ ज्या ठिकाणी निवडणुका होणार आहेत संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारांना नामनिर्देशनपत्रे १६ ते २० ऑक्टोबर २०२३ या कालावधीत दाखल करता येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी २३ ऑक्टोबर २०२३ रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे २५ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल”, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली.

५ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. मतमोजणी ६ नोव्हेंबर २०२३ रोजी होईल. मात्र गडचिरोली आणि गोंदिया या नक्षलग्रस्त भागात सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. तेथे ७ नोव्हेंबर २०२३ रोजी मतमोजणी होईल, असं यू. पी. एस. मदान यांनी सांगितलं.

निवडणूक आयोगाने जाहीर केलेली ही ग्रामपंचायत निवडणूक महत्त्वाची आहे. राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीआधी दरवेळी महत्त्वाच्या शहरांमधील महापालिका निवडणुका पार पडतात. पण यावेळी महापालिका निवडणुकीचा मुद्दा सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. महापालिका निवडणुकांना मिनी विधानसभा निवडणुका मानलं जातं. पण आता राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडत असल्यामुळे जनतेचा कल नेमका कुणाच्या बाजूने आहे ते ओझरत समजण्याची शक्यता आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाच्या गोटात हालचाली वाढल्या आहेत. प्रत्येक पक्ष कामाला लागला आहे. भाजपकडून जोरदार तयारी सुरु आहे. भाजपच्या गोटात दररोज बैठकांचं सत्र सुरु आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षांची देखील एकजूट होताना दिसत आहे. त्यामुळे आगामी काळात घडणाऱ्या घडामोडी महत्त्वाच्या असणार आहेत. या निवडणुकानंतर मात्र स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका निवडणुका होण्यास अडचण येणार नाही असे राजकीय क्षेत्रातून चर्चा होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page