महाराष्ट्राचे राज्यपाल, कोश्यारींच्या उचलबंगाडीचे संकेत..

मुंबई , दु.३ ( प्रतिनिधी ) छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यावरून अडचणीत आलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची पाच डिसेंबरनंतर उचलबांगडी होण्याचे संकेत आहेत. गुजरात विधानसभेच्या निवडणुकीचा दुसरा आणि अंतिम टप्पा पाच डिसेंबर रोजी पार पडणार असल्याने यानंतरच महाराष्ट्राचे राज्यपाल बदलले जातील, अशी सूत्रांची माहिती आहे.

राज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत राज्यपाल कोश्यारींच्या वक्तव्यावरून संताप आहे. त्यातच भाजपचे राज्यसभा खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे भोसले यांनीही संताप व्यक्त केला आहे. अशा स्थितीत राज्यपालांना कायम ठेवणे हे भाजपच्या अडचणीत भर टाकणारे असल्याचे मानले जाते.
गुजरातमध्येही पटेल, पाटीदार समाजात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आदर आहे. गुजरातेतील विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्यपाल बदलले तर त्याचे काही प्रमाणात पडसाद उमटण्याची भाजपला धास्ती आहे. दरम्यान, नागपूरच्या आगामी हिवाळी अधिवेशनात महाविकास आघाडीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात निषेध प्रस्ताव आणण्याची रणनीती आखली आहे. हा प्रस्ताव सरकारने स्वीकारला अथवा नाकारला तरी दोन्ही बाजूने सरकारची अडचण होणार हे निश्चित आहे. अशा स्थितीत दोन्ही बाजू सावरताना राज्यपाल कोश्यारी यांना हटविताना ‘टायमिंग’ साधण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page