भोरवाडीत रेल्वे प्रशासनाविरुद्ध आमरण उपोषण, सहा महिन्यांपासून रेल्वे पुलांची कामे रखडली
जेजुरी, दि ३ रेल्वे कडून कोळविहिरे व इतर गावांना जोडणाऱ्या दोन्ही रस्त्यावरील पुलांची कामे सहा महिने होऊन गेले तरी पूर्ण न झाल्याने कोळविहिरे येथील सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ खोमणे यांनी आजपासून भोरवाडी येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणाला परिसरातील अनेक गावांनी प्रथक्ष भेटून त्यांना पाठींबा व्यक्त केला आहे
रेल्वे कडून पुणे मिरज रेल्वे मार्गाच्या दुपरिकरणाचे काम सुरु असून रेल्वे क्रॉसिंग असेल तेथे उड्डाण पूल किंवा भुयारी मार्ग करण्याची कामे ही सुरू आहेत. जेजुरी रेल्वे स्टेशन नंतर निरेकडे जाणाऱ्या रेल्वे मार्गावरील कोळविहिरे, नावळी, राख, गुळुंचे, जोगावडी, मुरटी या गावांना जोडनारे दोन रस्ते आहेत. या दोन्ही रस्त्यांवर रेल्वे क्रॉसिंग असल्याने तेथे रेल्वे उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग केले जात आहेत. रेल्वे मार्गावरील एल सी गेट नं २२ आणि ओव्हर ब्रीज ६३ यांची कामे फेब्रुवारी २०२२ पासून सुरू आहेत. गेली सहा महिने ही दोन्ही गेट ची कामे रखडलेली असल्याने या मार्गावरून जाणाऱ्या पाच सहा गावांचा संपर्क तुटलेला आहे. रेल्वेने पर्यायी मार्ग दिला असला तरी त्याची दुरावस्था झालेली आहे. कोळविहिरे राख, गुळुंचे आदी गावांतील ग्रामस्थांनी याबाबत रेल्वे प्रशासनाकडे वारंवार मागणी, विनंती अर्ज करून ही ही दोन्ही कामे पूर्ण होत नसल्याने कोळविहिरे येथील सामाजिक कार्यकर्ते, पुरंदर तालुका मानव सेवा सुरक्षा सेवा संघाचे अध्यक्ष सोमनाथ खोमणे यांनी ३१ ऑगस्ट पर्यंत काम पूर्ण न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. रेल्वे प्रशासनाकडून याची कसलीच दखल न घेतल्याने त्यांनी आजपासून भोरवाडी नजीकच्या रेल्वे गेट न ६३ जवळ आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. यावेळी कोळविहिरेचे सरपंच महेश खैरे, माजी सरपंच बापू भोर, उत्तम जगताप, लहू शिंदे,गुळुंचे चे सरपंच संतोष निगडे, मावडीचे सरपंच बाप्पा चाचर, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
रेल्वे मार्ग गेट न २२ आणि ६३ ची कामे रखडल्याने शेतकरी, चाकरमानी, शालेय विद्यार्थी आदींचे प्रचंड हाल होत आहेत. जेजुरी हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने या गावांचा जेजुरीशी संपर्कच तुटला आहे. सर्वसामान्यांना त्रास होत असून जेजुरी कोळविहिरे रस्त्यावरील भुयारी मार्ग व जेजुरी भोरवाडी कोळविहिरे रस्त्यावरील ओव्हर ब्रीज ची कामे त्वरित सुरू करावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली. आमरण उपोषणाला परिसरातून मोठा पाठींबा ही मिळू लागला आहे. रेल्वे प्रशासनाकडून महिनाभरात ही कामे करू असे आश्वासन दिले जात आहे. मात्र प्रत्यक्ष काम सुरू करा मगच उपोषण मागे घेऊ असे उपोषण कर्त्यांकडून व ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे जेजुरी व रेल्वे पोलिसांचा येथे बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.