भीमा नदीतील त्या सात आत्महत्या नव्हत्याच मुळी……,घातपातच!
बदला घेण्यासाठी चुलत भावानेच हत्याकांड घडवून आणले
पोलिसांकडून अधिकृत माहिती
दौड, दि.२५ (प्रतिनिधी ) दौंड तालुक्यातील पारगाव येथे भीमा नदीपात्रात ६ दिवसांमध्ये एकाच कुटुंबातील ७ जणांचे मृतदेह आढळले होते. सुरवातीला या सात जणांनी सामुहिक आत्महत्या केल्याचे म्हटले जात होते पण ती आत्महत्या नसून खून असल्याचे समोर आले आहे. चुलत भावानेच त्यांचा खून करुन मृतदेह नदीत फेकले असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबतची माहिती पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पत्रकार परिषदेत दिली. आतापर्यंत पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये अशोक कल्याण पवार, शाम कल्याण पवार, शंकर कल्याण पवार, प्रकाश कल्याण पवार आणि कांताबाई सर्जेराव जाधव (सर्व राहणार निघोज, ता. पारनेर, नगर) त्यांना आज न्यायलायात हजर केले जाणार आहे. त्यानंतर अधिक तपास करण्यात येणार असल्याची माहिती गोयल यांनी दिली.
मोहन पवारांच्या चुलत भावांनी हे खून केल्याचे पोलिसांनी सांगितले. मोहन पवार यांचा मुलगाबरोबर असताना तीन ते चार महिन्यांपूर्वी चुलत भावाच्या मुलाला अपघात झाला होता. तो मुलगा हॉस्पिटलमध्ये असतानाही मोहन पवार व त्यांच्या मुलाने ही बाब त्यांना सांगितली नाही. ४ दिवसानंतर मुलाच्या अपघाताची माहिती चुलत भावाला मिळाली. त्यानंतर त्या मुलाचा मृत्यु झाला होता. या घटनेचा राग मनात धरुन चुलत भावाने या सर्वांची हत्या करुन त्यांचे मृतदेह नदीत फेकून दिल्याची माहिती समोर येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सात मृतदेह सापडल्याने उडाली होती खळबळ
मिळालेल्या माहीतीनुसार मोहन पवार हे पत्नी संगिता उर्फ शहाबाई, मुलगी राणी, जावई शाम, नातु रितेश, छोटु, कृष्णा यांचेसह व मुलगा अनिल यांचेसह मागील वर्षांपासुन निघोज ता. पारनेर येथे राहुन मजुरी काम करीत होते. पुणे जिल्ह्यातील पारगाव परिसरात या सात जणांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
बदल्यासाठी केला खून
आत्तापर्यंत झालेल्या तपासामध्ये आरोपी अशोक कल्याण पवार याचा मुलगा धनंजय याचा काही महिन्यांपूर्वी वाघोली येथे अपघाती मृत्यु झाला होता. त्या मृत्युमध्ये मृतक मोहन उत्तम पवार व त्याचा मुलगा अनिल मोहन पवार हेच जबाबदार आहेत असा आरोपींना संशय होता आणि त्याचा राग मनात होता त्या कारणावरून बदला घेण्यासाठी त्यांनी सदरचा गुन्हा केलेला आहे असे प्रथमदर्शनी समोर आलेले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.