भारतीय तिरंगा आता चंद्रावर ….

नवी दिल्ली : दि. २३ ( प्रतिनिधी ) भारताच्या महत्त्वाकांक्षी ‘चांद्रयान ३’चे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर अखेर यशस्वीरीत्या चंद्रावर उतरले आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर प्रथमच एखाद्या देशाचे यान उतरले असल्याने, भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) ऐतिहासिक कामगिरी करत जगाचे लक्ष वेधून घेतलं आहे. भारताची २०१९मधील ‘चांद्रयान २’ मोहीम अंशत: यशस्वी झाल्यानंतर, ‘इस्रो’ने नव्या मोहिमेला सुरुवात केली होती. त्यानुसार, या मोहिमेमध्ये लँडर आणि रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले आहेत. चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित आणि यशस्वी लँडिंग करणे, रोव्हरद्वारे चंद्राच्या पृष्ठभागाचे संशोधन करणे आणि काही प्रयोग करण्याचा या मोहिमेचा हेतू होता. लँडर मॉड्यूल चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यात यश आल्याने चंद्रावर यान उतरवणाऱ्या अमेरिका, सोव्हियत महासंघ आणि चीन यांच्यानंतर भारत चौथा देश ठरला आहे
ब्यालूलू येथील ‘इंडियन डीप स्पेस नेटवर्क’च्या केंद्रावरून या यानाच्या प्रत्येक हालचालींकडे लक्ष ठेवण्यात आले होते. तसेच यानाकडून मिळणारे सर्व सिग्नल टिपण्यात आले आहे. यासाठी अमेरिका आणि युरोपीय अवकाश संशोधन संस्थांचीही मदत घेण्यात येत होती.
चांद्रयान ३’ ही भारताची महत्त्वाकांक्षी मोहीम आहे. ‘चांद्रयान २’ मोहिमेतील लँडर चांद्रभूमीवर कोसळले होते. २०१९मध्ये झालेल्या या मोहिमेनंतर आता चार वर्षांनी ‘चांद्रयान ३’ चंद्रावर उतरले आहे.
मोहिमेचे उद्दिष्ट काय?
चांद्रभूमीवर सॉफ्ट लँडिंग करून, रोव्हर चालवण्याचे; तसेच चंद्रावरील मातीचे विश्लेषण करणारे वैज्ञानिक प्रयोग करण्याचे उद्दिष्ट आहे. मोहिमेमध्ये प्रॉपल्शन मॉड्यूल, लँडर आणि रोव्हरचा समावेश आहे. यातील प्रॉपल्शन मॉड्यूलवर ‘स्पेक्ट्रोपोलरीमेट्री ऑफ हॅबिटेबल प्लॅनेट अर्थ’ हा ‘पे लोड’ आहे. त्याद्वारे चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीची मोजमापे घेतली जातील.
दरम्यान, ‘इस्रो’ने १४ जुलै रोजी या यानाचे प्रक्षेपण केले होते. सुमारे ४१ दिवसांच्या प्रवासानंतर ‘चांद्रयान ३’ चंद्रावर उतरले आहे. एकीकडे रशियाचे ‘लुना-२५’ यान चंद्रावर उतरण्यात अपयशी ठरले असताना भारताची मोहीम मात्र यशस्वी झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page