भाजप चे ‘मिशन बारामती’ सुरू, राष्ट्रवादीला सुरुंग….पुरंदरचे माजी आमदार अशोक टेकवडे भाजप च्या गळाला

पुरंदर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस ला खिंडार
माजी आमदार अशोक टेकवडे करणार भाजप मध्ये प्रवेश

जेजुरी, दि.१५ पुरंदर तालुक्यातील राष्ट्रवादीचे एकमेव माजी आमदार अशोक टेकवडे हे गुरुवारी दि.१८ मे रोजी दुपारी १ वाजता पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथील कार्यक्रमात भाजप चे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप चे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे, आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आदींच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यांच्या सोबत बारामती लोकसभा मतदार संघ युवक काँग्रेस चे अध्यक्ष अजिंक्य टेकवडे हे ही भाजप मध्ये प्रवेश करणार आहेत.
अशोक टेकवडे यांच्या भाजप प्रवेशामुळे पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठे खिंडार पडण्याची शक्यता असून पक्षातील एक मोठा गट अशोक टेकवडे यांच्या सोबत जाणार अशी शक्यता वर्तवली जात आहे .

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील गटबाजी आणि घुसमट सहन न झाल्याने, तसेच वरिष्ठांकडून सातत्याने अन्याय केला जात असल्यानेच आ.टेकवडे यांनी हा निर्णय घेतल्याचे चर्चा आहे.
अशोक टेकवडे यांच्या भाजप प्रवेशातून भाजप ने ‘ मिशन बारामती ‘ ला सुरुवात केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत खा.सुप्रिया सुळे यांना याचा मोठा फटका बसणार असल्याची चर्चा आहे.

टेकवडे यांचा राजकीय प्रवास

अशोक टेकवडे यांचे वडील पुरंदर कै
कोंडीबा टेकवडे हे तालुका पंचायत समितीचे सदस्य होते. तेव्हापासून टेकवडेंचा राजकीय प्रवास सुरु झाला.ते एस काँग्रेस, काँग्रेस व नंतर राष्ट्रवादी काँग्रेसशी जोडले गेलेले आहेत. १९९० साली अशोक टेकवडे हे युवक काँग्रेसचे जिल्हा पदाधिकारी होते. विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे ते निकटवर्ती समजले जातात. अजित पवार यांनी १९९३ मध्ये निवड मंडळावर अशोक टेकवडे यांना संधी दिली होती. साहजिकच त्यांचे नेतृत्व खऱ्या अर्थाने विकसीत झाले. पुढे सन २००१ मध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर संचालक म्हणून अजित पवार यांनी त्यांना संधी दिली. जिल्हा बँकेचे अशोक टेकवडे अध्यक्षही झाले. अजित पवार यांच्या प्रयत्नातून नवा चेहरा म्हणून टेकवडे यांना सन २००४ च्या विधानसभा निवडणुकीत पुरंदर -हवेली मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी देण्यात आली
काँग्रेसचे नेते कै. चंदूकाका जगताप यांच्या सहकार्यातून ते सुमारे साडे चौदा हजारांच्या मताधिक्य मिळवून विजयी झाले. धर्मनिरपेक्ष जनतादल नेते तथा माजी राज्यमंत्री दादा जाधवराव यांचा पराभव झाला.

राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, अजित पवार यांनी सातत्याने टेकवडे यांना बळ दिले. मात्र २००९ मध्ये त्यांना पक्षाने विधानसभेचे तिकीट नाकारले. त्यावेळी ते प्रचंड नाराज होते, पण पक्ष सोडला नाही. गेली काही वर्षे त्यांनी मुलगा अजिंक्य टेकवडे याचे नेतृत्व विकसीत करण्याकडे लक्ष दिले. मात्र गटातटाच्या राजकारणात अजिंक्य टेकवडे यांना अडचणी निर्माण करण्याचेच सातत्याने प्रयत्न होत होते. पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष माणिक झेंडे यांच्या कार्यपध्दतीवर ही ते प्रचंड नाराज होते. याबाबत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींचे लेखी पत्र देऊन लक्ष वेधले होते. मात्र त्याची दखलच पक्षश्रेष्ठींनी घेतली नाही. त्यातून त्यांना मुलासह भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page