भाजपाचं मिशन बारामती!…. पवारांच्या बालेकिल्ल्यात बावनकुळेंची मोठी घोषणा

राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर अवघ्या दोनच महिन्यांत पुढील विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज बारामती दौऱ्यावर असून तिथे बोलताना बावनकुळेंनी भाजपाच्या ‘मिशन बारामती’चीही घोषणा केली. यावेळी बावनकुळेंनी पुढील सर्व निवडणुका एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि भाजपा एकत्र लढणार असल्याचं देखील जाहीर करतानाच या युतीच्या माध्यमातून विधानसभेत २००हून जास्त तर लोकसभेत राज्यातून ४५हून जास्त जागा निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

“महाराष्ट्रात ४५ हून अधिक लोकसभा जागा आणि २०० हून अधिक विधानसभेच्या जागा आमच्या युतीच्या बळावर आम्ही निवडून आणू. जनता ही विश्वासघात करणाऱ्यांना बाजूला करेल आणि जे खरे हिंदुत्वाचं रक्षण करणारे कार्यकर्ते आहेत, त्यांना जनता मदत करेल ही आम्हाला अपेक्षा आहे”, असं बावनकुळे यावेळी म्हणाले.
“येत्या दोन महिन्यात मी सर्व जिल्ह्यांचा दौरा करणार आहे. आमच्या संघटनेच्या माध्यातून पुढच्या काळात होणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, येणाऱ्या लोकसभा निवडणुका आणि विधानसभा निवडणुकांमध्ये आम्ही शिवसेना आणि भाजपा युतीच्या माध्यमातून ४५हून जास्त जागा जिंकून आणू”, असंही बावनकुळेंनी नमूद केलं.

बारामती जिंकण्याचा निर्धार!
दरम्यान, यावेळी बोलताना बावनकुळेंनी बारामतीची लोकसभेची जागा जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला. “केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण पूर्णवेळ प्रभारी आहेत. पुढच्या १८ महिन्यांत निर्मला सीतारमण ५ ते ६ वेळा बारामती दौऱ्यावर येऊन प्रत्येक वेळी तीन दिवस मुक्कामी असणार आहेत. इथल्या विकासाची परिस्थिती काय आहे, केंद्राकडून विकासाबाबत काय अपेक्षा आहे, राज्य सरकारच्या माध्यमातून काय करता येईल या दृष्टीने या दौऱ्यांमध्ये विचार करण्यात येईल”, असं बावनकुळे म्हणाले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page