बच्चू कडू मुख्यमंत्र्यांबरोबर, संघटना मात्र विरोधात आक्रमक

नाशिक दि. १३ शिंदे सरकारसोबत घरोबा केलेले माजी मंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांची संघटना सरकारच्याच विरोधात आक्रमक झाली आहे.

बच्चू कडू एकनाथ शिंदे यांच्या जवळचे असल्याने ते गुहाटी करून आलेले आहेत. शिंदे सरकारमध्ये ते मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार ही आहेत. मात्र त्यांचा पक्ष सरकार विरोधात आंदोलन करतांना दिसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नाशिकच्या जिल्हा परिषदेच्या बांधकाम प्रवेशद्वारावर पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी आंदोलन सुरू केले आहे. जिल्हा परिषद प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत विविध मागण्या केल्या आहे. याबाबत प्रहार जनशक्ती पक्षाच्या नाशिक विभागाने जिल्हा परिषदेची मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांना लेखी निवेदन दिले आहे.

एकनाथ शिंदे गटासोबत कडू असतांना त्यांच्याच पदाधिकारी आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याने कडू यांची नाराजी दाखविण्याचा हा प्रयत्न आहे का ? अशी चर्चा सुरू झाली आहे.

प्रहार कडून यावेळी लावण्यात आलेला फलकही मोठा चर्चेचा विषय ठरत आहे, यामध्ये थेट जिल्हा परिषद प्रशासनावर ताशेरे ओढण्यात आले आहे.
यामध्ये विविध विभागांकडून ग्रामीण भागातील सामान्य जनतेच्या समस्यांकडे होणारे दुर्लक्ष, काही विभागांकडून होत असलेली नियमबाह्य कामे तसेच,
काही विभागांकडून जनतेस योजनांपासून वंचित ठेवणे या निषेधार्थ जिल्हा प्रशासनाच्या विरोधात जाहीर आंदोलन असा उल्लेख फलकावर करण्यात आला आहे.
बच्चू कडू यांच्या संघटनेचे आंदोलन नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणावरून चर्चेत असते, माघे काही वर्षांपूर्वी कडू यांनी पालिका आयुक्तांची भेट ही चर्चेत राहिली आहे.

बच्चू कडू नेहमीच अधिकाऱ्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत असतात, मात्र आता सत्तेत मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या सोबत असतांना पक्षाचे आंदोलन चर्चेत आले आहे.

या आंदोलनात स्वतः बच्चू कडू उपस्थित नसले तरी बच्चू कडू यांच्या सांगण्यावरून हे आंदोलन झाले का ? मंत्रीपपदापासून दूर ठेवल्याने ही नाराजी दाखविण्याचा प्रयत्न होता का ? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page