प्रशासनाकडून गावगाडा अजून किती दिवस चालवणार

माजी नगराध्यक्षा वीणा सोनवणे
जेजुरी, दि. ९ गेले सहा महिन्यांपासून जेजुरीसह राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. यामुळे गाव गाड्यांचा संपूर्ण ताण प्रशासनावर आला आहे. प्रशासन मात्र नागरिकांचे प्रश्न सोडवण्यास असमर्थ ठरत असल्याने सर्वत्र नाराजीचा सूर येत आहे. यामुळे नगरपालिका किंवा इतर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लवकरात लवकर घेणे आवश्यक असल्याचे जेजुरी नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा सौ वीणा सोनवणे यांनी लोकमत शी बोलताना सांगितले.
जेजुरी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांची मुदत गेल्या १५ फेब्रुवारी रोजी संपल्यानंतर पालिकेची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर येऊन पडली आहे. पालिकेचा कारभार प्रशासनाकडून चालवणे योग्य होत नाही. जेजुरी नगरपालिकेचाच विचार केला तर नागरिकांच्या अडी अडचणी सोडवणे, नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवणे प्रशासनाला ही शक्य होत नाही. अनेकदा प्रशासकीय अधिकारी कर्मचारी त्यांच्या दैनंदिन कामकाजामुळे उपलब्ध होत नाहीत. सर्वसामान्यांना त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सहज उपलब्ध होऊ शकणार लोकप्रतिनिधी आवश्यक असतात. शेवटी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या काम करन्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. प्रशकीय अधिकारी पूर्णवेळ सामान्यांसाठी उपलब्ध होऊ शकत नाहीत. शहरातील रस्त्यांची कामे, साफसफाई, स्वच्छता, नाले सफाई, त्याच बरोबर सद्या पावसाळा आहे. साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. अशा प्रसंगी प्रशासनाला योग्य त्या सूचना देणे आवश्यक असते
लोकप्रतिनिधीच नसल्याने ही संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर आलेली आहे. प्रशासनाकडून याबाबत ताबडतोब कारवाई अपेक्षित आहे. सर्वसामान्यांना आपली गाऱ्हाणी मांडायची कोणाकडे हाच प्रश्न निर्माण झाला आहे. नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या मुदती संपल्याने सार्वजनिक कामांचा ताण प्रशासनावरच आलेला आहे. आणि प्रशासन सर्वांना योग्य तो न्याय देऊ शकत नाही ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. जनतेत यामुळे असंतोष वाढताना दिसत आहे.
अशीच परिस्थिती सर्वत्र असून शासनाने लवकरात लवकर सार्वत्रिक निवडणुका घेऊन सर्वसामान्यांना न्याय देणे अत्यंत गरजेचे असल्याचे ही सौ. सोनवणे यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page