पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली होणार जेजुरी विकास आराखड्याची कामे… पहिल्या टप्प्यात जेजुरी गड संवर्धनाची कामे – सहाय्यक संचालक विलास वाहने यांची माहिती
जेजुरी,दि.२५ महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या तीर्थक्षेत्र जेजुरीच्या विकास आराखड्याची शासकीय पातळीवरून मंजुरी मिळालेली आहे यातील पहिल्या टप्प्यात जेजुरी गड संवर्धनाअंतर्गत कामे लवकरच सुरू होणार असल्याची माहिती पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वहाणे यांनी दिली.
जेजुरीचा खंडेराया तसेच ऐतिहासिक सांस्कृतिक शहराची ओळख म्हणून प्रचलित असलेल्या जेजुरी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील विकास कामांना लवकरच प्रारंभ होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वहाणे यांनी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेला होळकर तलाव, मल्हार गौतमेश्वर मंदिर ,जननी तिर्थकुंड पूर्व -दक्षिण दिशेला असलेला ऐतिहासिक पेशवे तलाव,बल्लाळेश्वर मंदिर ,दक्षिणेला असलेले लवथळेश्वर मंदिर व तिर्थकुंड यांची पाहणी केली. यावेळी पुरातत्व अभियंता रामेश्वर निपाणे ,वास्तू संवर्धन विशारद तेजस्विनी आफळे आदी उपस्थित होते.
तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील विकास कामांचा प्रारंभ जेजुरीतील मल्हार गडकोट मुख्य मंदिरापासून होणार असून तीन टप्प्यांमध्ये हे काम करण्यात येणार आहे पैकी टप्पा क्र.१) मंजुरी १७कोटी २२लक्ष रुपयांपैकी १३कोटी ७३लक्ष रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती .या कामांची वर्क ऑर्डर लवकरच देण्यात येत आहे यामध्ये ,गडकोट ,मुख्य मंदिर , तटबंदी ,सज्जा ,गडकोट आवारातील उपमंदिरे (देवकुळे)यांचे वॉटरप्रुफिंग ,ग्राऊंटिंग ,दडस्टिंग डागडुजी ,दुरुस्ती,जतन ,संवर्धन होणार आहे यामध्ये रासायनिक प्रक्रियेची कामे जास्त असून आवश्यक तेथे झीज झालेले दगड बदलण्यात येणार आहेत.
दुसरा टप्पा -१५कोटी ३४लक्ष रुपयांचा असून यामध्ये १५४पैकी १४३दीपमाळा ,१४कमानी (वेशी, २८उपमंदिरे (देवकुळे)आदींचे जतन ,संवर्धन डागडुजी दुरुस्ती होणार आहे.
तर तिसरा टप्पा १४कोटी ९५लक्ष रुपयांचा असून गडकोटाच्या चारही मार्गावरील सुमारे १४३६ पाय-यांची डागडुजी दुरुस्ती होणार आहे. तिन्ही टप्प्यातील कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून .जिल्हाधिकारी पुणे यांचेकडे निविदा मंजुरी व वर्कऑर्डरची कार्यवाही पूर्ण होत जून २०२३पर्यंत कामांना सुरुवात होणार आहे. या कामांमध्ये गडकोट पायरीमार्ग परिसर व्यवस्थापन करण्यात येणार आहे .प्रामुख्याने स्वच्छतागृहांची दुरुस्ती,चप्पलस्टॅण्ड ,पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन,दर्शन रांग,नियोजित दुकाने,धार्मिक विधींसाठी जागा ,देवसंस्थान कार्यालय ,व्हीआयपी कक्ष,भाविकांना बसण्यासाठी आसनव्यवस्था ,अत्याधुनिक विद्युत गृह ,कर्मचारी वर्गाला चेंजिंग रूम ,चारचाकी वाहनतळ व्यवस्था आदींचा समावेश करण्यात आला आहे.जून २०२३पर्यंत तिन्ही टप्प्यातील कामांना सुरुवात होणार आहे.मात्र कामे करताना फार मोठ्या दिव्यातून जावे लागणार आहे.जत्रा यात्रा उत्सव यामुळे देवदर्शन व धार्मिक विधींसाठी भाविकांची गर्दी रोजचीच असते .त्यांना कोणताही अडसर ,अडचण निर्माण न करता कामे करावी लागणार आहेत.त्यामुळे मंदिर प्रशासन व देवसंस्थान कडून सहकार्य अपेक्षित आहे .असेही आवाहन पुरातत्व खात्याने केले आहे.
गडकोट आवारात स्वच्छतागृह देता येत नाही.
मंदिर व गडाचे दरवाजे रात्रौ १०ते पहाटे ५वाजेपर्यंत बंद झाल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव गडकोट आवारात किमान ८ते १०कर्मचारी पुजारी,व सेवेकरी असतात .मात्र त्यांना रात्रीच्या वेळी नैसर्गिक विधींची कोणतीही व्यवस्था नाही.गडाची भौगोलिक रचना व पावित्र्य पाहता गडकोट आवारात स्वच्छतागृह निर्माण करता येऊ शकत नाही. तसेच सध्या भेसळयुक्त व केमिकलचा वापर केलेल्या भंडारा उधळणीमुळे गडकोटाच्या दगडांची मोठ्या प्रमाणावर झीज होते तसेच रंगही बदलतो ही समस्या सुद्धा मोठी असून भेसळयुक्त किंवा केमिकलचा वापर असलेला भंडारा उधळण्यात येऊ नये किंवा त्याचा वापर होऊ नये यासाठी उपाययोजना राबवणे गरजेचे आहे.अशी माहिती पुरातत्व विभागाकडून देण्यात आली.
ऐतिहासिक होळकर व पेशवे तलाव यांचे देखभाल करण्याची जबाबदारी कुणाची????
तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये ऐतिहासिक होळकर तलाव, मल्हार गौतमेश्वर मंदिर ,जननी तीर्थ ,पेशवे तलाव ,बल्लाळेश्वर मंदिर ,खटावकर विहीर ,आदी वास्तू-स्थळांचा समावेश करण्यात आला आहे.त्याअनुषंगाने या वास्तूंची पाहणी पुरातत्व विभागाकडून करण्यात आली. यामध्ये पेशवे तलाव ,होळकर तलाव स्वच्छता ,दुरुस्ती ,जतन ,संवर्धन,दगडी पथ ,पायरी दुरुस्ती,संरक्षक कुंपण ,इंजिनघर डागडुजी फ्लोरिंग फाऊंटन आदी सुविधा व सुशोभीकरण करण्यात येणार आहे वरील सर्व कामासाठी अंदाजे ११ते १२कोटी रुपयांची तरतूद करण्यात येत आहे. असे असले तरी नजीक असलेली चिंचेची बाग ,भाविकांचा धार्मिक विधी आणि त्यांच्याकडून होत असलेले कचरा ,व निर्माल्य पाहता पुढील काळात देखभाल ,व्यवस्थापन करण्याची जबाबदारी कुणावर सोपवायची ?याबाबत जिल्हाधिकारी पुणे यांचेकडे बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे.अशी माहिती पुरातत्व विभागाकडून देण्यात आली.