पुरंदर मध्ये शिवतारे सेना सुसाट ?
राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नुकताच पुरंदर दौरा झाला. जेजुरीच्या कुलदैवताचे दर्शन आणि सासवड येथे शेतकरी संवाद मेळावा हे दोन कार्यक्रम या दौऱ्यात होते. मुख्यमंत्र्यांनी दोन्ही कार्यक्रमाला हजेरी लावून माजी राज्यमंत्री विजय शिवतारेना सेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात जात मुख्यमंत्री शिंदे गटात सामील झाल्याबद्दल ताकद देण्याचा प्रयत्न केला. प्रथमदर्शनी ताकद ही मिळाली. तालुक्यात आता विजय शिवतारेंची सेना आता सुसाट निघणार अशाच चर्चा तालुक्यातील राजकीय क्षेत्रात होऊ लागली आहे.
अशी चर्चा जरी सुरू असली तरीही विजय शिवतारेना त्यासाठी खूप मोठा संघर्ष आणि ताकद लावावी लागणार आहे. मुळातच शिवतारेंचा राजकीय प्रवास राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि आता शिंदे गट असा झाल्याने त्यांना पुरंदर वाशीय किती साथ देतील ते पाहावे लागेल. सुरुवातीला त्यांनी शिवसेना नेते उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांची ताकद वापरून २००९ मध्ये तालुक्यात स्वतःची प्रतिमा निर्माण केली. पुरंदरच्या विकास बारामतीकरांमुळे झाला नाही. असा प्रचार करीत पवार कुटुंबीयांवर थेट आरोप करीत पुरंदरच्या जनतेची मने जिंकली. विधानसभा निवडणुकीत त्याच बारामतीकरांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना आतून साथ दिल्याने ते दोन्ही वेळा विधानसभा मारली. मात्र शिवतारेनी तरीही आपल्या राजकीय भवितव्यासाठी बारामतीकरांवर आरोप करणे सोडले नाही. शेवटी बारामतीकरांनीच त्यांना सांगून घरी बसवले.
गेल्या अडीच वर्षात ते स्वतःचा आजार आणि कौटुंबिक कलहात अडकले होते. पुरंदर पंचयात समिती ताब्यात असल्याने ते अधून मधून मुंबईहून इथे येऊन डरकाळ्या फोडून कार्यकर्यांना चेतवत ठेवत होतेच. सुदैवाने त्यांची शिवसेना फुटली. शिवसेनेची सरळसरळ दोन शकले झाली. शिवतारेनी ही परिस्थिती पाहून शिंदे गट जवळ केला. सरळ सरळ सेना प्रमुख उद्धव ठाकरेंना विरोध दर्शविला. आपले राजकीय अस्तिव टिकवण्यासाठी बारामतीकरांवर आगपाखड न करता आपण त्यांच्या विरोधात जाऊन चूक केल्याचे कबूल करून त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवतारेना शिंदेंची बंडखोरी जवळची वाटू लागली. आणि पुन्हा नव्याने राजकीय खेळी करीत सासवड येथे शेतकरी मेळावा घेऊन त्यांनी मुख्यमंत्र्यांना मतदार संघात आणले. जाहीर सभेतून त्यांच्याकडून पुरंदरच्या विकासातील शिवतारेना अभिप्रेत असणारे मुद्दे मुख्यमंत्र्यांकडून वदवून घेतले. मुख्यमंत्र्यांनी ही त्यांच्या सर्व मुद्यांना हात घालून विश्वास देण्याचा प्रयत्न केला. मात्र मुख्यमंत्री जरी सांगून गेले असले तरीही त्यात कितपत यश येणार हे पाहावे लागेल.
विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्र्यांना मतदार संघात आणून नवीन राजकीय पट मांडला आहे. जुने निष्ठावंत शिवसैनिक मात्र त्यांच्या पटात सहभागी झालेले नाहीत. उलट पुरंदर आणि हवेलीतील निष्ठावंत पेटून उठले आहेत. त्याचा मोठा फटका शिवतारेना बसणार आहे हे ही नक्की. याशिवाय परवा झालेला शेतकरी मेळावा हा केवळ एकट्या शिवतारेनी जुळवून आणलेला नव्हता. पुरंदर हवेली मतदार संघातील भारतीय जनता पक्षानेही मेळावा यशस्वी करण्यासाठी मोठी ताकद दिली होती.
मेळाव्यात शेतकरी हिताचे ठोस निर्णय काहीच झाले नाहीत. आणि ते शक्य ही नव्हते. केवळ आश्वासने च देण्यात आली. शिवतारेंची गेल्या दहा बारा वर्षातील मुद्देच पुन्हा चर्चेत आली. गुंजवनीचे पाणी, पुरंदरचे नियोजित विमानतळ आणि नव्याने भर पडलेले दिवे येथील आंतरराष्ट्रीय बाजार यावरच संपूर्ण मेळावा पूर्ण झाला. हे सर्व मुद्दे पुरंदरच्या राजकारणाभोवती अनेक वर्षांपासून फिरताना दिसतात. पुरंदर उपसा योजना पाणी दर आणि वीज बील यावर मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे. याबाबत अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.
मुख्यमंत्री पुणे जिल्ह्यात आले खरे मात्र त्यांचा हा संपूर्ण दौरा हा भाजप कडूनच हायजॅक केला गेल्याची चर्चा ही आहे.
मुख्यमंत्र्यांनी पुरंदर मध्ये येऊन बारामतीकरांवर टीका टिप्पणी करतील. असा ही कयास होता. मात्र त्यांनी कोणावरही टीका करणार नसल्याचे सांगत केवळ पक्षातून बाहेर पडण्यामागचे कारण सांगून जनतेचा पाठींबा विश्वास मिळवण्याचाच प्रयत्न केला.
काहीही असो, मुख्यमंत्री पुरंदर मध्ये आले. जेजुरी गडावर जाणारे पहिले मुख्यमंत्री ठरले. एवढेच.
या मेळाव्याचा आता विजय शिवतारे किती लाभ मिळणार हे पाहावे लागणार आहे. भविष्यात येऊ घातलेल्या निवडणुका त्यांना स्वबळावर लढवता येतील का ? हे ही तितकेच खरे. भविष्यातील राजकारणात त्यांना भाजप ला विश्वासात घेऊनच चालावे लागणार आहेत. गेल्या दहा बारा वर्षात मी म्हणेल तेच अंतिम हा स्वभाव त्यांना बदलावा लागणार आहे. पुरंदरचे प्रलंबित प्रश्न जर त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून किंवा राज्याच्या मंत्रिमंडळातील एक घटक म्हणून जर सर्वांना विश्वासात घेऊन रेटले असते तर आतापर्यंत हे प्रश्न प्रलंबित राहिलेच नसते. हे ही तेवढेच खरे आहे.
शिवतारेंचा शेतकरी मेळावा पुरंदर वाशीयांच्या विकासासाठी हातभार लावणारा असेल तर त्याचे आम्ही स्वागतच करू असे म्हणत पुरंदरचे विद्यमान लोकप्रतिनिधी संजय जगताप यांनी प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांची मेळाव्यापुर्वीच भेट घेऊन शिवतारेंना शह देण्याचा प्रयत्न केला होता. मुख्यमंत्री हा संपूर्ण राज्याचा प्रमुख असल्याने त्यांच्याकडे जनहीताची कामे आपण केव्हाही आणि कधीही घेऊन जाणार आहोत. आणि त्यांच्याकडून ती करूनही घेऊ अशी खात्री आ संजय जगताप यांनी व्यक्त केली आहे. यातून भविष्यात आ संजय जगताप मुख्यमंत्र्यांच्या अधिक जवळ जातील हे मात्र शक्य वाटत नाही.
या संपूर्ण मेळाव्याबाबत पुरंदरचे राष्ट्रवादी नेते मात्र अंग राखून होते. मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसवर जहरी टीका विजय शिवतारेनी केल्याने पक्ष कार्यकर्ते चांगलेच संतापले आहेत. भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस ची साथ शिवतारेना मिळण्याची शक्यता नाहीच. अशीच आजची परिस्थिती आहे.
एकूण विजय शिवतारे यांनी वेळ साधून षटकार मारला आहे. मात्र तो सीमापार जाणार का? की बोलाचीच कढी आणि बोलचाच भात ? हे येणारा काळच ठरवणार आहे.