पुरंदर मध्ये महसूल दिनाच्या निमित्ताने युवा संवाद उपक्रम…
जेजुरी, दि. ३ राज्यांमध्ये ०१ ऑगस्ट ते ०७ ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताह साजरा करण्यात येत असून या निमित्ताने बुधवार दि.२ रोजी पुरंदर तालुक्यातील सर्व मंडल मध्ये प्रमुख शाळांमध्ये युवा संवाद या उपक्रमाच्या माध्यमातून ९ वी ते १२ पर्यंतच्या विद्यार्थ्यांना १० वी व १२ वी नंतर शिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व दाखल्यांची माहिती देण्याचा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमाच्या माध्यमातून कुंभारवळण मंडल मध्ये पिसर्वे येथील डॉ. शंकरराव कोलते माध्यमिक विद्यालयात दौंड-पुरंदर महसूल उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला यांनी येथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी कुंभारवळण मंडलचे मंडलअधिकारी दुर्गादास शेळकंदे ,तलाठी जगताप, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी मुल्ला यांनी या उपक्रमाची माहिती देत असताना सप्ताहामध्ये विद्यार्थ्यांना दहावी बारावीच्या नंतर विविध क्षेत्रांमध्ये प्रवेश घेत असताना अनेक दाखल्यांची आवश्यकता असते अशावेळी विद्यार्थ्यांची धावपळ कमी व्हावी यासाठी विद्यार्थ्यांनी आता या संबंधित अर्ज करून कागदपत्र सादर केली तर या सप्ताहामध्ये संबंधित दाखले विद्यार्थ्यांना वितरित केली जातील असे सांगितले . ज्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढली नाहीत त्यांचे आधार कार्ड काढून घेण्याबाबतचे नियोजन याविषयी माहिती यादरम्यान दीली. त्याचप्रमाणे या पुढील पाच दिवसांमध्ये पुर्व मान्सून व मान्सून कालावधीमध्ये प्रलंबित असणाऱ्या लाभार्थ्यांचे लाभ देणे, तलाठी व कृषी सहाय्यक यांच्या साह्याने पिक विमा बाबत मार्गदर्शन करत पिक विमा काढण्याबाबत लोकांना प्रवृत्त करणे, महसूल अदालतीत प्रलंबित नोंदी व केसेस यांची सुनावणी करणे ,आजी-माजी सैनिकांच्या महसूल विषयी अडचणी सोडवणे बाबत नियोजन करणे, महसूल विभागातील कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या अडीअडचणी सोडवणे बाबत नियोजन करणे आदी उपक्रम राबवले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी महसूल विभागास नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.