पुरंदर मधील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी.
सासवड दि. २ ( प्रतिनिधी )
पुरंदर तालुक्यात यावर्षी पावसाळा उशिरा सुरु झाला असून खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. त्यातूनही शेतकऱ्यांनी धडपड करून पिके घेतली, परंतु जास्त पावसाने पूर्णपणे उध्वस्त झाली आहेत. आता रब्बी हंगाम तोंडावर आला असताना त्याचीही धास्ती लागली आहे. बाजरी, भुईमुग, वाटाणा, घेवडा यांसह तरकारी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्याचे आमदार संजय जगताप यांच्यासह सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी शासनाला पिकांचे पंचनामे करण्याची मागणी केली असताना शासन काहीच हालचाल करीत नसल्याने पंचनामे कधी होणार ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले असून शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी वनपुरी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या उपाध्यक्षा भारती सुनिल गायकवाड यांनी मागणी केली आहे.
पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वाटाणा या पिकासह सर्वच पिके पाण्याखाली गेली आहेत. तर मागील दोन दिवसांत झालेल्या जोराच्या पावसाने राहिलेली पिकेही पाण्याखाली गेली आहेत. कशीबशी आलेली बाजरी, घेवडा, भुईमुग, शेतात आताच टाकलेली कांद्याची रोपे नष्ट झाली आहेत. फळ बागांचेही मोठे नुकसान झाले आहे. एकूणच यामुळे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटणार असून शासनाने नुकसानीची तातडीने दखल घेण्याची मागणी भारती गायकवाड यांनी केली आहे.
पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी सांगितले कि, काळदरी परिसरात झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून त्यांना मदत देण्याची कार्यवाही सुरु आहे. तसेच तालुक्यातील इतर भागात पावसाने नुकसान झाले असल्यास संबंधित विभागाच्या कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क करून नुकसानीचे पंचनामे करून घ्यावेत. याबाबत मी स्वतः कृषी अधिकाऱ्यांना पंचनामे करण्यास सांगितले आहे.
तालुका कृषी अधिकारी सुरज जाधव यांनी सांगितले कि, तहसीलदारांकडून आम्हाला नुकसानीचा आढावा घेण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार प्रत्येक विभागाचे मंडल अधिकारी, गावांचे तलाठी, ग्रामसेवक यांच्याकडून नुकसानीचे आढावा घेवून पंचनामे करण्यात येतील. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी आपल्या गावचे तलाठी भाऊसाहेब यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन सुरज जाधव यांनी केले आहे.