पुरंदर पंचायत समितीला चार वर्षांपासून “गुणवंत शिक्षक पुरस्काराचा” विसर… ?
जेजुरी – (बी एम काळे) शैक्षणिक क्षेत्रात दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त उल्लेखनीय व प्रशंसनीय शैक्षणिक कार्य करणाऱ्या शिक्षकांना ‘गुणवंत शिक्षक पुरस्कार’ देवून सन्मानित केले जाते.
मात्र पुरंदर पंचायत समिती मार्फत शिक्षक,केंद्रप्रमुख, विस्ताराधिकारी, विषय तज्ञ यांना चार वर्षे पुरस्कारापासून वंचित ठेवले आहे. यामुळे पुरंदर तालुक्यातील शैक्षणिक गुणवत्ता उत्तम आहे. मात्र गुणवंत शिक्षकच नाहीत काय? अशीच चर्चा तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रातून होऊ लागली आहे. याबाबत काही शिक्षक संघटनांनी प्रशासन आणि आ.संजय जगताप यांच्याशी संपर्क साधून लक्ष घालण्याची विनंती ही केलेली आहे.
तीन वर्षांपूर्वी कोरोना काळात पुरंदरमधील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन, ऑफलाईन अध्यापनाबरोबर,कोरोना सर्वेक्षण, लसीकरण जनजागृती सर्वे, चेकपोस्ट ड्यूटी, कोवीड सेंटरवर रुग्णांना मदत यांसह सुमारे १२ लक्ष रुपये मुख्यमंत्री साहाय्यता निधीला मदत अशी उल्लेखनीय कार्ये केले होते.
मात्र गेल्या चार वर्षापासून शिक्षकांना पुरस्कारापासून वंचित ठेवण्यात आले.
याबाबत ‘पुरंदर पंचायत समितीला गुणवंत शिक्षक पुरस्काराच विसर.’या मथळ्याखाली २२ सप्टेंबर २०२२ रोजी लोकमतने बातमी प्रसिद्ध करून वाचा फोडली होती.
त्यानुसार पुरंदरचे तत्कालीन गटविकास अधिकारी अमर माने व पुरंदरचे तत्कालीन प्रभारी गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत उगले यांनी तीन वर्षापासूनचे ‘गुणवंत शिक्षक पुरस्कार’ त्वरित देण्यात येणार असल्याचे सांगितले. मात्र पुढे कोणतीच कार्यवाही झाली नाहीच.
उलट संपूर्ण शैक्षणिक वर्ष उलटून गेले तरी देखील पुरंदर मधील शिक्षकांना अद्याप पुरस्कार मिळाले नाहीत.
त्यामुळे मागील चार वर्षांसह चालू शैक्षणिक वर्षात उलेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे.अशी मागणी पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक समितीतर्फे अध्यक्ष सुनील कुंजीर,सरचिटणीस भाऊसाहेब बरकडे,मनोजकुमार सटाले यांनी २८ ऑगस्ट रोजी पुरंदरचे गटशिक्षणाधिकारी निलेश गवळी यांच्याकडे केली.
पुणे जिल्ह्यातील अन्य तालुक्यांमध्ये गेल्या चार वर्षांचे ‘गुणवंत शिक्षक’ पुरस्काराचे वितरण करण्यात आले.मात्र पुरंदरमधील शिक्षकांना पुरस्कारापासून वंचित ठेवण्यात आले आहे. याबाबत पुरंदरचे आमदार संजय जगताप यांचेमार्फत मागील व चालू शैक्षणिक वर्षाचे पुरस्कार शिक्षकांना मिळावेत.यासाठी विनंती केल्याचे पुणे जिल्हा शिक्षक समितीचे सरचिटणीस संदीप जगताप यांनी सांगितले.
* ** तीन वर्षांपूर्वी शिक्षण विभागाने जमा केलेला कोरोना निधी ९२ हजार रुपये आजही खर्च केलेला नाही. या निधीबाबत ही पुरंदर च्या गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून वर्ष उलटले तरी ही काहीही नियोजन झालेले नाही.
या निधीतून शिक्षक पुरस्कार देण्यास शिक्षकांनी विरोध केला.त्यामुळे आता या निधीतून पंचायत समिती शिक्षण विभागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी जोर धरु लागली आहे.*