पुरंदर पंचायत समितीला “गुणवंत शिक्षक पुरस्काराचा” विसर… ९२ हजार रुपये ‘कोरोना मदत’ निधीचे काय ?

जेजुरी, दि.२२ (प्रतिनिधी ) शैक्षणिक क्षेत्रात दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त उल्लेखनीय व प्रशंसनीय शैक्षणिक कार्य करणाऱ्या शिक्षकांना ‘गुणवंत शिक्षक पुरस्कार’ देवून सन्मानित केले जाते.
मात्र पुरंदर पंचायत समिती मार्फत शिक्षक,केंद्रप्रमुख, विस्ताराधिकारी,विषय तज्ञ यांना तीन वर्षांपासून पुरस्कार दिले गेले नाहीत.
दोन वर्षांपूर्वी कोरोना काळात पुरंदरमधील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन,ऑफलाइन अध्यापनाबरोबर,कोरोना सर्वेक्षण,लसीकरण जनजागृती सर्वे,चेकपोस्ट ड्यूटी,कोवीड सेंटरवर रुग्णांना मदत यांसह सुमारे १२ लक्ष रुपये मुख्यमंत्री साहाय्यता निधीला मदत अशी उल्लेखनीय कार्ये पुरंदर तालुक्यातील शिक्षकांनी केली.
कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये (मे २०२०) कोरोना काळात गरजूंना मदत व्हावी म्हणून पुरंदरचे तत्कालीन गटशिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी शिक्षकांना कोरोना मदत निधीसाठी आवाहन केले त्यानुसार पुरंदर मधील शिक्षकांनी मदत निधी गोळा केला.मात्र संबंधित निधीचा विनियोग गरजूंना केला नाही.याबाबत दोन वर्षांपूर्वी पुरंदरचे आमदार,सभापतींसह,जिल्हा परिषकडे तक्रारी प्राप्त झाल्या.
त्या तक्रारींची दखल घेत दोन वर्षांपूर्वी पुरंदरचे आमदार संजय जगताप,सभापती नलीनी लोळे,गटविकास अधिकारी अमर माने यांनी याबाबत सुमारे ९२हजार शिल्लक कोरोना मदत निधीतून गरजूंना त्वरीत मदत व्हावी यासाठी संबंधितांना सुचनाही दिल्या.
तरीसुद्धा कोरोना मदत निधीचा उपयोग आजअखेर गरजूंना झाला नाही. त्यामुळे(सुमारे ९२ हजार रु.)आजही शिक्षण विभागाकडे शिल्लक आहेत.
या निधीतून शिक्षकांना पुरस्कार द्यावेत,यासाठी गतवर्षी तत्कालीन गटशिक्षणाधिकारी पी एस मेमाणे यांनी प्रयत्न केले.मात्र कोरोना मदत निधीतून ‘शिक्षकांना पुरस्कार देण्यास विरोध झाला.

"कोरोना निधीचा विनियोग योग्य पध्दतीने होईल यासाठी व शिक्षक पुरस्कारासंदर्भात गटशिक्षणाधिकाऱ्यांना योग्य त्या सुचना दिल्या आहेत.लवकरच निर्णय होईल."-

अमर माने
गटविकास अधिकारी,पुरंदर

“९२ हजार रुपये कोरोना मदत निधी शिल्लक असून सर्व शिक्षक संघटना प्रतिनिधींशी यासंदर्भात बैठक घेवून कोरोना निधी विनियोग व शिक्षक पुरस्काराबाबत चर्चा करून नियोजन करणार आहोत.” – चंद्रकांत उगले
प्रभारी गटशिक्षणाधिकारी, पुरंदर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page