पुरंदर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती.दुष्काळी नियोजनाची गरज..प्रशासन लागले कामाला…
जेजुरी, दि.२५ ( बी एम काळे ) पुरंदर तालुक्यात या वर्षी पावसाने हुलकावणी दिल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुका प्रशासनाने त्या दृष्टीने नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
पुरंदर तालुका तसा अवर्षण ग्रस्त तालुका मानला जातो. मात्र योग्य पर्जन्यमान राहिल्यास पुरंदर तालुक्यात अवर्षांनाची परिस्थिती कधीच जाणवत नाही. यंदा मात्र पुरंदर तालुक्यात पावसाने बळीराजाला चिंतातुर बनवले आहे. पावसाने अजूनही समाधानकारक हजेरी लावलेली नसल्याने बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. उर्वरित महिनाभरात जर पावसाने दिलासा दिलाच तर खरीप हंगामाऐवजी रब्बीला जीवदान मिळेल आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तरी मार्गी लागेल. अन्यथा पिके तर गेल्यातच जमा आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागेल. शिवाय उदर निर्वाहाचा प्रश्न ही गंभीर असेल. अशीच परिस्थिती आज असल्याने गावागावात दुष्काळी स्थिती निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
यावर्षीच्या पर्जन्यमानाचा विचार करता गेल्यावर्षी आजच्या तारखेला सरासरी ३७१ मिमी पाऊस झाला होता. यावर्षी मात्र ११८ मिमी पाऊस झाल्याने पुरंदरचे जनजीवन अडचणीत आले आहे. तालुक्यात आज अखेर किमान ३१० मिमी पर्जन्यमान अपेक्षित होते मात्र पाऊस झाला ११८ मिमी म्हणजेच केवळ अपेक्षेच्या ३८ टक्केच पर्जन्यमान राहिले आहे. या अत्यल्प पर्जन्यमानाचा फटका पुरंदरच्या जनजीवणावर मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे, पिके धोक्यात असतानाच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ही गंभीर बनत चालला आहे. तालुक्यातील वीर आणि गराडे या जलाशयात पाणी असले तरी तालुक्यातील इतर सर्वच जलाशये कोरडी पडली आहेत, जेजुरी नजीकच्या नाझरे जलाशयात ही आता गाळमिश्रित पाणी शिल्लक राहिले आहे. आज नाझरे जलाशयात केवळ १२५ दशलक्ष घनफुट एवढेच पाणी शिल्लक राहिले आहे. जलाशयाचा मृत साठा २०० दशलक्ष घनफुट एवढा आहे. मृतसाठ्यापेक्षाही जलाशयात पाणी कमी असल्याने जेजुरी शहर, पुरंदर आणि बारामती तालुक्यातील सुमारे ५० गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ही गंभीर बनला आहे. पावसाअभावी ठिकठिकाणचे जलशये कोरडी पडल्यामुळे आता गावा गावातून टँकरचे प्रस्ताव शासन दरबारी जाऊ लागले आहेत. तर काही गावांना वाड्या वस्त्यांना टँकरने पाणी पुरवठा सुरू करावा लागला आहे. यामुळे बळीराजा चांगलाच अडचणीत आला आहे.
तालुक्यातील शेती ही पूर्णपणे पावसावरच अवलंबून आहे. सुरुवातीला पावसाने हजेरी लावली. शेतकरी वर्गाने मशागतीची कामे करून पेरण्या ही केल्या. मात्र गेले महिनाभरापासून पावसाने तोंड फिरवल्याने आहे ती पिके ही जाळून गेली आहे. जेथे सिंचन सुविधा आहे तेथे पिके अजून तग धरून असली तरी पाऊस पडणे अपेक्षित आहे. अन्यथा आहेत ती ही पिके हातून जाण्याचीच शक्यता निर्माण झाली आहे.
तालुक्यातील खरीप हंगाम मात्र संपल्यातच जमा झाला आहे. तालुक्यात खरीप हंगामाचे एकूण ३५००० हेक्टर क्षेत्र आहे. यातील सुमारे २१००० हेक्टर क्षेत्र हे खरिपातील मुख्य पिकांचे आहे. यातील सुमारे १५५३२ हेक्टर म्हणजेच ७१ टक्के क्षेत्रावर पेरण्या झालेल्या आहेत. यात बाजरी ( ५६०१ हे. ) भात ११०२ हे. भुईमूग २३६१ हे. सोयाबीन १८०० हे. वाटाणा १७०० हे. पेरण्या झाल्या आहेत आणि आडसाली ऊस १३०० हे. लागवडी झाल्या आहेत. आज मात्र ही पिके पूर्णपणे जाळून जाण्याच्या मार्गावर आहेत.
एकीकडे पावसाने दिलेली हुलकावणी, यातून निर्माण झालेली पिण्याचे पाणी, शेती सिंचन पाणी आदिंची चिंतातुर स्थिती आणि या सर्वांमुळे उदर निर्वाहाचा आ वासून उभा ठाकलेला गंभीर प्रश्न सर्वसामान्यांना १९७२ च्या दुष्काळाची आठवण करून देऊ लागला आहे. साहजिकच संपूर्ण वर्षच विस्कळीत झाले आहे.
प्रशासनाने याबाबत गांभीर्याने आजच नियोजनास सुरुवात करायला हवी. जेणे करून गंभीर परिस्थितीत माणसे, जनावरे यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसेच उदर निर्वाहाची समस्या सुटू शकेल. याबाबत प्रशासनाने नियोजन करण्यास सुरुवात करायला हवीच अशीच मागणी जोर धरू लागली आहे.
या संदर्भात पुरंदरचे कृषी अधिकारी सुरज जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही आजची वस्तुस्थिती मान्य करून त्यादृष्टीने तहसील कार्यालय यांच्या सहकार्याने नियोजन सुरू केल्याचे सांगितले.
पर्जन्यमान अत्यल्प राहिल्याने जनजीवणावर मोठा परिणाम झाला आहे. शेतातील उभी पिके ही जळू लागली आहेत. त्यासाठी प्रशासन पातळीवरून पीक विमा धारकांना नुकसान भरपाई मिळावी, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी नियोजन करण्यात येत असून तसे प्रस्ताव तयार करन्यात येत असल्याचे ही त्यांनी सांगितले.