पुरंदर तालुक्यात अवघा ४५ टक्के पाणी साठा, २२ हजार लोकसंख्येला ११ टँकर द्वारे पाणी पुरवठा, दुष्काळी परिस्थिती गंभीर….
जेजुरी, दि. १४ पुरंदर तालुक्यातील पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या १० जलाशयातून आज अवघा ४५ टक्के च पाणी साठा शिल्लक आहे. तर पुरंदर पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागाकडून ११ टँकरद्वारे सुमारे२१ हजार ६२२ लोकसंख्येला पाणी पुरवठा करावा लागत आहे. आता पावसाळा संपला असून पुढील ८ ते ९ महिने तालुक्यातील पाणीपुरवठ्याची स्थिती अत्यंत गंभीर स्वरूपाची असणार आहे. यामुळे सर्वसामान्य शेतकरी वर्ग मोठया चिंतेने ग्रासला आहे. शासनाकडून दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
यावर्षी पावसाने पुरंदरवाशीयांची चांगलीच परीक्षा पाहिली आहे. तालुक्यात सरासरी एवढा पाऊस झाल्याच्या नोंदी असल्या तरीही दक्षिण पुरंदर पट्ट्यातच पर्जन्यमान चांगले राहिले आहे. इतरत्र मात्र तालुक्याच्या ५० टक्के पेक्षा जास्त भूभाग पावसापासून वंचितच राहिला आहे. यामुळे अत्यल्प पावसामुळे यंदा चा ७० टक्केपेक्षा जास्त खरीप हंगाम हाती येऊ शकला नाही. पुढील रब्बी हंगाम तर दूरच. गेल्या महिन्यातच पर्जन्यमान सुमार होते. मात्र आता सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे.
पुरंदर तालुक्यातील पाणी पुरवठा करणाऱ्या १० जलाशयात एकूण ४५ टक्केच पाणीसाठी उपलब्ध झाला आहे. यात गराडे, माहूर, विरनाला या जलशायतून पूर्ण क्षमतेने पाणी साठा उपलब्ध झालेला असला तरी ही नाझरे जलाशय ( ११८ दशलक्ष घनफुट ) घोरवडी ( १४ दशलक्ष घनफुट) पिंगोरी ( ९.५ दशलक्ष घनफुट ) पिलानवाडी ( ३५ दशलक्ष घनफुट ) पिसर्वे, वाल्हे, आडाची वाडी येथील जलाशये कोरडी ठण झालेली आहेत. तालुक्यातील सर्वात मोठे जलाशय असणारे नाझरे धरणात मृतसाठ्याच्या निम्मेच पाणी शिल्लक आहे. हे पाणी पिण्यासाठी उपयुक्त नाही मात्र यावरच जलशयावरील ५० गावांची तहान भागवावी लागणार आहे.
पुरंदर तालुक्यातील सुमारे २१हजार ६२२ लोकसंख्येला ११ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. सोनोरी, वाल्हे, वागदर वाडी, रिसे, पिसे, राजुरी, साकुर्डे, जवळर्जुन, दौडज, दिवे, झेंडे वाडी या सात गावांच्या ५७ वाड्यावस्त्या वर ५७ टँकर खेपातून पिण्याचे पाणी पुरवले जात आहे. आता पावसाळा संपल्यातच जमा असून पुढील ८ ते १० महिने पिण्याच्या पाण्याच्या गंभीर समस्या निर्माण झालेल्या आहेत. सर्वसामान्य जनता आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष आणि त्याची दाहकता ओळखून सर्वसामान्य हवालदिल झाला आहे. प्रशासनाला याबाबत मोठया गांभीर्याने मार्ग काढावा लागणार आहे. प्रशासनाने आताच नियोजन करणे गरजेचे असून शासनाने ही त्वरित दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे .