पुरंदर तालुक्यातील सोमुर्डी येथील मंदिरात चार लाखांची चोरी…
सासवड, दि.२८ (प्रतिनिधी ) पुरंदर तालुक्यातील सोमुर्डी येथील काळभैरव मंदिराच्या गाभाऱ्याचा दरवाज्याचा कोंयडा तोडून आत प्रवेश करून सोन्या चांदीचे ऐवज चोरी झाले असून याबाबत फिर्यादी पुजारी अशोक भिवा पन्हाळकर, रा. सोमुर्डी, ता. पुरंदर जि. पुणे यांनी आरोपी अज्ञात चोरटा याच्या विरोधात सासवड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत सासवड पोलीस स्टेशनला पुजाऱ्याने दिलेली फिर्याद अशी की, मी, रा. सोमुर्डी, ता. पुरंदर जि. पुणे वरील पत्त्यावर माझ्या बायका मुलासह राहतो. गावातील काळभैरवनाथ मंदिरामध्ये पुजारी म्हणून काम करतो. गावातील काळभैरवनाथ मंदिरातील साफसफाई स्वच्छता दोन वेळी देवाची पूजा, आरती अशी कामे मी करतो. गावातील लोक या बदल्यात मला धान्य वगैरे देतात. देवाचे मुकुट, देवाचा अश्व, पादुका आणि काळभैरवनाथ जोगेश्वरीची चांदीची मूर्ती मंदिरामध्ये आहे. या मूर्ती आम्ही सणावारासाठी फक्त बाहेर काढतो नाहीतर त्या माझ्या ताब्यात घरी असतात. मंदिरात फक्त दगडी मूर्ती असते. देवाला साधारण 10 तोळ्याचे सोन्याचे दागिने आहेत. ते दागिने आम्ही फक्त यात्रेमध्ये आणि नवरात्रीमध्ये देवाला घालतो. दागिने सरपंचाच्या ताब्यात असतात. मागील सोमवारी घटस्थापने दिवशी आम्ही देवाला सोन्याचे दागिने घातलेले होते.तसेच चांदीचा अश्व पादुका व जोगेश्वरी भैरवनाथ चांदीची मूर्ती सुद्धा पूजेसाठी पायथ्याला ठेवली होती.
काल, दि.२८ रोजी सकाळी ६ वाजता मंदिरात गेलो. देवपूजा आरती आटोपली आणि ७ वाजता आतील गाभाऱ्याला कुलूप लावून बंद केला. त्यानंतर दुसऱ्या मंदिरामध्ये पूजेसाठी गेलो. त्यानंतर मी घरी गेलो. नाश्ता केला व ९.३० वाजता पुन्हा भैरवनाथ मंदिरामध्ये आलो. त्यावेळी मला गाभाऱ्याचा दरवाजाला लावलेला कोयंडा तुटलेला दिसला. त्या ठिकाणी मला कुलूप दिसले नाही. मी आजूबाजूला कुलूप पाहिले, परंतु कुलूप त्या ठिकाणी नव्हते. मी दरवाजा उघडून आत गेलो देवीच्या अंगावर पाहिले तर देवीच्या गळ्यातील सर्व सोन्याचे दागिने दिसून आले नाहीत. तसेच मूर्तीच्या समोर ठेवलेला चांदीचा अश्व पादुका व मूर्ती त्या ठिकाणी दिसली नाही. मी लगेच बाहेर आलो बाजूच्या दुकानासमोर गावातील लोक होते. त्यांना बोलावले आणि त्यांना झालेला प्रकार सांगितला त्यानंतर गावातील बरेच लोक जमले. त्यांनी पण पाहिले त्यानंतर पोलीस स्टेशनला कळवले चोरी गेलेल्या दागिन्यांचे वर्णन खालील प्रमाणे
७५०००/- दीड तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र
१७५०००/- साडे तीन तोळे वजनाचा एक राणीहार
६५०००/- दीड तोळे वजनाचा सोन्याचा पुतळा हार
२५०००/- अर्धा किलो वजनाची देवाची चांदीची मूर्ती
२५०००/- अर्धा किलो वजनाच्या चांदीच्या पादुका
३५०००/- ७०० ग्रॅम वजनाचा एक चांदीचा अश्व
—————–
एकूण ४०००००/- रूपयाचे सोन्या चादींचे दागिने व मुर्ती अशाप्रकारे वस्तू कोणीतरी अज्ञात चोराने गाभाऱ्याच्या दरवाज्याच्या कोयडा तोडून आत प्रवेश करून चोरून नेल्या आहेत.
यावरून सासवड पोलिसांनी भा.द.वि.क. ४५४, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
अधिक तपास सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई झिंजुरके करत आहेत.